top of page

‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धे’त सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र परिचय केंद्राचा अभिनव उपक्रम

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या हीरक महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इच्छुकांना भाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

‘मराठी भाषा पंधरवडा’ निमित्ताने ‘ट्विटर कवि संमेलन’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिन’ निमित्ताने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन या यशस्वी उपक्रमासोबत आता महाराष्ट्र परिचय केंद्राने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशात वास्तव्यास असणाऱ्या व मराठी भाषा अवगत असणाऱ्या व्यक्तींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन परिचय केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

‘हीरक’ महोत्सव महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हीरक महोत्सवी वर्ष सुरु आहे. स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्राने समाजप्रबोधन आणि सामाजिक विकासात केलेले कार्य देशातील अन्य राज्यांसाठी प्रेरणादायी आहे. राज्यातील धुरीणांनी राज्याच्या विकासाचे स्वप्न बाळगून त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी अविरत कष्ट उपसले. सध्या महाराष्ट्र हे देशात उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य असून देशातील सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक राज्यात झाली आहे. देशातील सर्वात चांगल्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत. राज्यातील सिंचन प्रकल्पांनी शेती विकासाला गती दिली आहे. सहकार चळवळीने राज्याच्या ग्रामीण भागाचे चित्र पालटविले आहे. वंचित उपेक्षित घटकांबरोबर महिला आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्राने अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. महाराष्ट्राने देशाला ‘रोजगार हमी योजना’, ‘माहितीचा अधिकार’ सारखे प्रभावी कार्यक्रम दिले. राज्याने उद्योग, सहकार, ऊर्जा, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात अद्वितीय कार्य केले जे इतर राज्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे. महाराष्ट्राची अशीच गौरवशाली पंरपरा महाराष्ट्र गौरव गीतामध्ये प्रतिबिंबीत व्हावी या उद्देशाने परिचय केंद्राने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेचे नियम व अटी 1) 18 वर्षांवरील मराठी भाषा अवगत असणाऱ्या सर्व नागरिकांस ही स्पर्धा खुली आहे. 2) महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेसाठी स्पर्धकाला एक व जास्तीत-जास्त दोन स्वरचित गीत पाठवता येतील. 3) महाराष्ट्र गौरव गीत पाठविणाऱ्या स्पर्धकाने त्यांचे गीत ही स्वत:चीच रचना असल्याचे लेखी प्रतिज्ञा पत्र परिचय केंद्रास देणे आवश्यक आहे. 4) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संमती पत्रही सोबत जोडणे आवश्यक आहे. 5) पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी परिचय केंद्रातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. निवड समितीने घेतलेला निर्णय स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

या पत्त्यावर गीत पाठवा या स्पर्धेसाठी १० एप्रिल २०२१ पर्यंत गीत पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्पर्धकाने प्रतिज्ञापत्र आणि संमती पत्रासह आपली गीत रचना महाराष्ट्र परिचय केंद्र, ए-8, स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबा खडकसिंह मार्ग, नवी दिल्ली-11001.’ या आमच्या कार्यालयाच्या पत्यावर टपालाद्वारे पाठवावी. संबंधित रचना, प्रतिज्ञापत्र व संमतीपत्राची एक प्रत माहितीसाठी आमच्या कार्यालयीन ईमेल ‍micnewdelhi@gmail.com वरही पाठवावी.

परिक्षक मंडळ व पुरस्काराविषयी या स्पर्धेसाठी प्राप्त गीत रचनेची निवड ही या कार्यालयाद्वारे नेमण्यात आलेल्या साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या एका परिक्षक मंडळाकडून करण्यात येईल. स्पर्धेत पहिल्या तीन ठरणाऱ्या रचनांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल 1 मे 2021 या महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात येईल. पहिल्या तीन उत्तम गीत रचनांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र स्वरुपात पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ०११­२३३६३७७३ /२३३६७८३०/९८११७६२०३१/ ९८७१७४२७६७ रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 40 / दिनांक 02.03.2021

bottom of page