top of page
Writer's pictureMahannewsonline

...पण पुढचा मोर्चा न सांगता काढू

मराठा आक्रोश मोर्चा : ‘एक मराठा…लाख मराठा’चा आवाज पुन्हा घुमला

सोलापूर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. संचारबंदीचे आदेश झुगारून हजारो मराठा तरुणांनी या मोर्चात भाग घेतला. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’, अशा गगनभेदी घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

कोरोनाचा संसर्ग पाहता मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. या मोर्चाच्या निमित्तानं शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात आली होती. मात्र, संचारबंदीचे आदेश झुगारून पाटील यांनी मोर्चा काढला. संभाजी चौकात सकाळीच आंदोलक जमू लागले. त्यानंतर दुपारी ही गर्दी वाढल्याने आंदोलकांच्या घोषणाही दणाणू लागल्या. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना सोलापूरच्या बाहेर अडवले गेले.

यावेळी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, सोलापुरातून आज पहिला आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यासाठी आम्ही आठ दिवसांपासून तयारी केली होती. पण महाविकास आघाडीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न केले. राज्यात अनेक मोर्चे निघाले. अनेक आंदोलने झाली. त्यांना परवानगी दिली गेली. ते मोर्चे मोडीत काढले नाहीत. फक्त मराठा मोर्चेच अडवले जात आहेत, असा गंभीर आरोप करतानाच ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

आजच्या मोर्चात सहभागी झालेल्या एकही तरुणावर गुन्हा दाखल करू नका. गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर करा. आजचा मोर्चा यशस्वी झाला, अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिला. आम्ही कुणालाही टार्गेट करत नाही, आम्ही कुणाला टोला लगावला नाही. आज सांगून मोर्चा काढला तर तुम्ही एवढी यंत्रणा उभी केली. पण पुढचा मोर्चा न सांगता काढू. तेव्हा सरकार आणि यंत्रणा काय करते ते पाहूच, असा इशारा नरेंद्र पाटलांनी दिला आहे.

या मोर्चाला नरेंद्र पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते,आमदार राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे, महापौर श्रीकांचना यन्नम, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे,रणजितसिंह मोहिते पाटील,प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते.


bottom of page