top of page
Writer's pictureMahannewsonline

मराठा आरक्षण : पुनर्विचार याचिका फेटाळली, संभाजीराजेंनी सांगितला पर्याय

पुणे: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे एस ई बी सी करण्याचा राज्याला अधिकार नाही हे स्पष्ट होत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी आता घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकारने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती जनसंवाद यात्रेसाठी आज पुण्याच्या वाघोलीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, ”केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली आहे. याचा अर्थ असा होतो, की राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. म्हणून आता पर्याय काय? मी अगोदर पासून बोलत आलेलो आहे.आता पुनरविचार याचिकेचा विषयच उद्भवत नाही. दुसरा मार्ग काय ? की आपण मागासवर्ग आयोग तयार करून, आपल्याला परत एकदा सर्व गोष्टी जमा कराव्या लागतील, ज्या गायकवाड अहवालात त्रुटी आहेत आणि मग आपण राज्यपालांच्या माध्यमातून ती शिफारस करू शकतो. मग ते राष्ट्रपतींकडे जाईल, राष्ट्रपती ३४२ अ च्या माध्यामातून जर त्यांना वाटलं, तर केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देऊ शकतात. केंद्रीय मागासवर्गीय आयोग, राज्य मागासवर्गीय आयोगाकडे देऊन सगळा डाटा घेणार. मग जर वाटलं तर संसदेला देऊ शकता, हा एक भाग झाला. दुसरं, जी याचिका फेटाळलेली आहे. माझी केंद्र सरकारली ही विनंती राहणार आहे, की तुम्ही वटहुकूम काढावा, यानंतर तुम्हाला घटना दुरूस्तीशिवाय पर्याय राहत नाही. घटना दुरूस्ती देखील तुम्ही करायला हवी. जेणेकरून राज्याला ते अधिकार राहतात. हे एवढेच पर्याय आता या मिनिटाला समोर दिसतात, दुसरे पर्याय कुठलेही नाहीत.”

कोल्हापूर आणि नाशिकला मूक आंदोलन झालं. सध्या या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, आम्ही जनसंवाद दौरा सुरू केला आहे. पुण्याच्या वाघोलीतून या दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने मराठवाडा आणि विदर्भात जाऊन तिथल्या मराठा संघटनांशी संवाद साधण्यात येणार आहे, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.


bottom of page