top of page
Writer's pictureMahannewsonline

योगाचे महत्व कोविड संकटकाळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले ...

सोलापूर- प्राचीन काळापासून निरोगी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या योगाचे महत्व कोविड संकटकाळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नियमित शास्त्रशुद्ध पद्धतीने योग केल्यास संपूर्ण आयुष्य मानवाला निरोगी राहता येते. निरोगी शरीराची साथ लाभल्यास निश्चितच आनंदी जीवन जगण्यास मदत होते, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले की, योग हा शारीरिक स्वास्थ्य याबरोबरच मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्वाचा आहे. आपण जो श्वास घेतो, दीर्घ श्वास घेणे, श्वासाचे वेगवेगळे व्यायाम हे शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरासाठी व शरीराच्या प्रत्येक अवयवांमध्ये प्राण वायू संचारित होण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग अतिशय उपयुक्त ठरतो. श्वास घेण्याची प्रक्रिया, त्याला काही वेळ रोखणे आणि हळूहळू सोडणे, ही पद्धत अतिशी नीटपणे समजून घेऊन त्याचा दररोज उपयोग केल्यास निश्चितच आपली प्रतिकार शकते वाढते व नियंत्रणात राहते. आपल्या पूर्वजांनी मस्तकापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाची हालचाल व्हावी, अशा पद्धतीने योगचे विविध प्रकार प्रत्यक्षात आणल्या आहेत. त्याचे लिखाण होऊन प्रकाशनही झालेले आहे, पण त्याचा उपयोग व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये व्यायामासाठी एक विशिष्ट वेळ राखून ठेवली जाते, त्यात योग केले जाते. त्यामुळे एक ऊर्जा प्राप्त होते. योगबरोबरच उत्तम आहार तसेच आरामाची ठराविक वेळ आणि ताण कमी करण्याच्या विविध पद्धतीमुळे मानवाला आपले जीवन आनंदात जगता येते.

कोविड संकट काळात आपली प्रतिकारशक्ती सदृढ ठेवण्यासाठी लहान मुलांपासून तरुण पिढी तसेच नागरिकांनी देखील नियमित योगाची सवय लावून घेणे अतिशय गरजेचे आहे. योगाचे विविध प्रकार करताना त्यात चुका होऊ न देणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचे प्रशिक्षण घेऊन योगा करणे हे फायदेशीर ठरणार आहे. ताणतणावाला दूर ठेवणे, मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे हे फार महत्त्वाचे आहे आणि ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे.

योगाचे महत्त्व ओळखूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम, योगातून पदवी आणि आता एमए योगा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. सोलापूरकरांचा त्यास उदंड प्रतिसाद आहे. सोलापूरकरांची मागणी व आजची गरज ओळखूनच योगाचे वर्ग विद्यापीठाच्यावतीने सुरू करण्यात आले आहे, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले


bottom of page