top of page
Writer's pictureMahannewsonline

मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही...

अकोला : सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचं वृत्त काल (सोमवार) समोर आलं होतं. त्यानंतर खुद्द अमोल मिटकर यांनी रुग्णालयामधील फोटो ट्विट करत आपली प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य कला चित्रपट विभागाच्या विदर्भ अध्यक्षा असणाऱ्या गायिका वैशाली माडे यांचा सत्कार सोहळा पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर काही नेते देखील उपस्थित होते. अमोल मिटकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर ते आपल्या खास शैलीमध्ये ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली’ हे गायला सुरुवात केली. मात्र, काही क्षणामध्ये मिटकरी यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तातडीने आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. काही वेबसाईट्सने तशा प्रकारच्या बातम्याही दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ट्विटवरुन स्वत:चा रुग्णालयामधील एक फोटो ट्विट करत अमोल मिटकरी यांनी प्रकृतीसंदर्भातील माहिती आपल्या समर्थकांना दिलीय.


“आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.लवकरच जनसेवेत रुजू होईल.” असं अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



bottom of page