top of page
Writer's pictureMahannewsonline

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुल्क आकारणाऱ्या 2 नेट कॅफे विरोधात गुन्हे दाखल

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलाकडून शंभर रुपये व दोनशे रुपये शुल्क आकारल्याप्रकरणी सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरातील दोन नेट चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरत असताना महा-ई-सेवा केंद्र अथवा नेट कॅफे यांनी कोणतेही शुल्क न आकारता मोफत अर्ज भरून महिला लाभार्थ्यांना सहकार्य करण्याबाबत शासन निर्णन्यावे निर्देशित केलेले आहे.



सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरातील प्रगती नेट कॅफे व योगेश्वर नेट कॅफेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी १०० रुपये व २०० रुपये घेऊन अर्ज भरले जात असल्याची माहिती गुप्तवार्ता विभागाकडून सोलापूर उत्तरचे प्रांत अधिकारी सदाशिव पडणे यांना मिळाली. त्यानंतर प्रांताधिकारी पडदूणे यांनी उत्तर तहसिलदार यांना संबंधित नेट कॅफे कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले. तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी सारिका कल्याण वाव्हाळ यांना संबंधित नेट कॅफे वर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास शुल्क आकारले जात असल्याची खात्री करून गुन्हे दाखल करण्याविषयी निर्देशित करण्यात आले.



उपरोक्त दोन्ही नेट कॅफे मध्ये या योजनेसाठी महिला लाभार्थ्याकडून अर्ज भरण्यासाठी शुल्क आकारले गेले याची खात्री झाल्यानंतर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या मंडलाधिकारी सारिका कल्याण वाव्हळ यांनी सदर बझार पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. ते दोन्ही नेट कॅफे अधिकृत ई महा सेवा केंद्र नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही नेट चालकाविरुद्ध भा न्या सं 318(2),318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.




Recent Posts

See All
bottom of page