top of page
Writer's pictureMahannewsonline

“नाव राष्ट्रवादी आणि राजकारण संकुचित….”, मनसेने साधला राष्ट्रवादीवर निशाणा

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला या राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आज राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “नाव राष्ट्रवादी आणि राजकारण संकुचित असलेल्या लोकांनी आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच.महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच.”असं त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

१७ ऑगस्टलाही देशपांडे यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर टीका केली होती. "राष्ट्रवादी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे." असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं होतं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना त्यांनी याला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते.


bottom of page