खासदार वसंत चव्हाण यांचे निधन
नांदेडचे खासदार आणि काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळे त्यांना नियमित आरोग्य चाचण्या करणे जमलं नव्हतं. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळ तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. खासदार चव्हाण यांच्या निधनामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
सरपंच ते खासदार
वसंत चव्हाण १९७८ साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. नंतर त्यांना जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. २००२ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तेथून पुढे तब्बल १६ वर्षे ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतरावच ठरले.
नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी भाजपचे तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत विजय खेचून आणला होता. वसंतराव चव्हाण यांना ५,२८,८९४ तर चिखलीकरांना ४,६९,४५२ मतं मिळाली होती. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नांदेडमधील निवडणूक चर्चेत आली होती.