top of page
Writer's pictureMahannewsonline

महावितरणच्या अभियंत्याला पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न

मोडनिंब येथील शेतकऱ्यांना महावितरणकडून आठ दिवसांची मुदत

बिले न भरल्यास पुन्हा वीज तोडण्याचा इशारा

बारामती: मोडनिंब (ता. माढा) येथे तोडलेले वीज कनेक्शन जोडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमावाने आज (दि.२३) महावितरणच्या अभियंत्याला पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला असून, वीज कर्मचाऱ्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. या प्रकारानंतर महावितरणने मोडनिंब भागातील शेतकऱ्यांना आठ दिवसांची मुदत देत मुदतीनंतर बीले न भरणाऱ्या शेतीपंपाचा वीजपुरवठा पुन्हा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.


महावितरणने वीजबिले भरण्याचा तगादा लावला की शेतकऱ्यांकडून नैसर्गिक आपत्तीचे अथवा शेतमालाच्या बाजारभावाचे कारण देऊन टाळाटाळ केली जाते. परंतु महावितरणची आर्थिकस्थिती पाहता थकबाकी वसूलीशिवाय तरणोपाय नाही. परिणामी महावितरणकडून वसूली मोहीम कठोरपणे राबविली जात आहे. या मोहीमेला विरोध करण्यासाठी मोडनिंब येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर आज जवळपास अडीचशेहून अधिक शेतकऱ्यांनी भाजीपाल्यासह आंदोलन केले. शनिवारी नोटीस देऊन सोमवारी केलेल्या आंदोलनाला टेंभूर्णीचे उपकार्यकारी अभियंता उद्धव जाधव यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले होते.


दरम्यान, आंदोलनातील सात-आठ नागरिकांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा ‘स्टंट’ केला. तर काहींनी अभियंता जाधव यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बळाचा वापर करुन त्यांच्याच अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस व वीज कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करुन जाधव यांना वाचविले.


मात्र, जमावाने त्यांच्यावर दबाव टाकत तोडलेले कनेक्शन जोडण्याची मागणी लावून धरली. तेंव्हा जाधव यांनी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे व बार्शी विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक लहामगे यांच्याशी चर्चा करुन शेतकऱ्यांना आठ दिवसांची अंतिम मुदत दिली. मुदत देताना आठ दिवसानंतर बील न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजापोटी तोडणार असल्याचे बजावून सांगितले.

bottom of page