top of page
Writer's pictureMahannewsonline

पुणे विभागात एक लाखांवर नवीन वीजमीटर उपलब्ध

गेल्या वर्षभरात सव्वादोन लाखांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा महावितरणकडून तातडीने दूर करण्यात येत असून पुणे प्रादेशिक विभागात गेल्या मार्च महिन्यात सिंगल व थ्री फेजच्या 78 हजार 496 नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्या पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या दोन्ही प्रकारचे 1 लाख 5 हजार 787 वीजमीटर उपलब्ध आहेत.

महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून निविदाअंतर्गत पुरवठादारांना 18 लाख सिंगल तर 1 लाख 70 हजार थ्री फेजच्या नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचा कार्यादेश नुकताच देण्यात आला आहे. त्याप्रमाणे मार्च महिन्यात 3 लाख 80 हजार वीजमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. यात पुणे प्रादेशिक विभागासाठी सिंगल फेजचे 73 हजार 996 आणि थ्री फेजचे 4500 मीटर उपलब्ध झाले असून प्रादेशिक कार्यालयाकडून ते संबंधीत मंडल कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत.


सद्यस्थितीत पुणे प्रादेशिक विभागामध्ये 92 हजार 665 सिंगल फेजचे आणि 13 हजार 122 थ्री फेजचे मीटर उपलब्ध आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात 56941 सिंगल तर 5798 थ्री फेज, सातारा जिल्हा – 11786 सिंगल तर 2174 थ्री फेज, सोलापूर जिल्हा – 10083 सिंगल, 1358 थ्री फेज, कोल्हापूर जिल्हा- 6556 सिंगल तर 822 थ्री फेज आणि सांगली जिल्ह्यात 7299 सिंगल तर 2970 थ्री फेजचे मीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना खुल्या बाजारातून नवीन वीजमीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही.

वीजमीटरचा पुरवठा आता सुरळीत झाला असून मुख्यालयातून प्राप्त झालेले नवीन वीजमीटर संबंधीत मंडल कार्यालयांना पाठविण्यात येत आहेत. आवश्यक प्रमाणात वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे प्रलंबित नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याची तातडीने कार्यवाही करण्यात यावी. मीटरच्या स्थानिक उपलब्धतेसाठी मंडल अंतर्गत कार्यालयांमध्ये समन्वय साधण्यात यावा तसेच ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याती यावी असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहेत. वीजजोडणी किंवा वीजमीटर संदर्भात काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास महावितरणच्या 24x7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांनी संपर्क साधावा.


आर्थिक वर्षात सव्वा दोन लाख नवीन वीजजोडण्या - गेल्या आर्थिक वर्षात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना देखील नवीन वीजजोडण्यांच्या कामात महावितरणकडून कोणताही खंड पडलेला नाही. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या वर्षभराच्या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 2 लाख 28 हजार 693 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात – 1 लाख 23 हजार 629, सातारा जिल्हा – 25 हजार 734, सोलापूर जिल्हा – 26 हजार 514, कोल्हापूर जिल्हा – 30 हजार 138 आणि सांगली जिल्ह्यात 22 हजार 678 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.


bottom of page