top of page
Writer's pictureMahannewsonline

उत्तम धोरणांची साथ शेतीला हवी – डॉ. बुधाजीराव मुळीक

नवी दिल्ली : उत्तम शासकीय धोरणांची व चांगल्या योजनांची साथ सलग ५ वर्ष शेतीला मिळाली तर १ हजार वर्ष शेतकरी सर्वांना सांभाळेल, असे प्रतिपादन, कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी आज केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे आठवे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्रातील बदललेली शेती’ या विषयावर डॉ. मुळीक बोलत होते.

महाराष्ट्रातील शेती व कृषी आधारित उद्योगांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शेतीमध्ये काळानुरूप होत असलेल्या बदलांचा स्वीकार करून राज्यातील शेतीची वाटचाल होत आहे. कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे यामाध्यमातून शास्त्रोक्त पध्दतीने शेती होत आहे. शेतीपूरक व्यवसायही आता तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने प्रगतशील वाटचाल करीत असल्याचे आश्वासक चित्र राज्यात असल्याचे डॉ. मुळीक म्हणाले. महाराष्ट्र राज्याची स्थापना व सुरूवातीला अधिक धान्य पिकविण्याच्या उद्देशाने शेतीची वाटचाल सुरु झाली. पुढे शेतीने यांत्रिकीकरणाचा बदल स्वीकारला. १९६६- ६७ मध्ये देशात झालेल्या हरित क्रांतीतून शेतीत झालेला बदल. ब‍ी – बियाण्यांतील बदल. जनावरांचे संकरीकरण. आणि पुढे १९७१ मध्ये धुळे जिल्ह्यातून राज्यात सुरु झालेल्या धवल क्रांतीने बदल घडून आणला. निलक्रांतीतून मासेमारी क्षेत्रात बदल घडून आला. त्यानंतर फलोत्पादन क्षेत्रात झोलेल्या सप्तरंगी क्रांतीने विविध बदल झाले. १९९०-९१ मध्ये देशाने स्वीकारलेले जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण आणि १९९५ पासून जागतिकीकरण राबवायला झालेली सुरुवात अशा सर्व टप्प्यांवर राज्यातील शेतीत झालेल्या बदलांचे निरीक्षण डॉ. मुळीक यांनी यावेळी नोंदविले. बदलत्या काळानुसार राज्यात स्थापन झालेली कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, विभागीय हवामान केंद्रे यातून राज्यातील शेतीत आलेले सकारात्मक बदल अधोरेखीत करतानाच १९५० ते ६० च्या दशकात विदर्भ व मराठवाड्याची धान्याची कोठारे म्हणून असलेली ओळख यावरही डॉ. मुळीक यांनी प्रकाश टाकला. शेती पिकांचे बदलत गेलेले वाण आणि शेतकऱ्यांच्या पशुधनातही काळानुरुप होत गेलेले बदलांवरही डॉ. मुळीक यांनी प्रकाश टाकला.

राज्यात २०१८ च्या जनगणनेनुसार १ कोटी ५३ लाख शेतकरी आहेत. भारतात जवळपास १५ कोटी शेतकरी असून ही संख्या जगातील एकूण शेतकऱ्यांच्या २४ टक्के असल्याचे डॉ. मुळीक म्हणाले. राज्यात सुरुवातीच्या काळात रुळलेली मिश्रपीक पध्दती जावून नव्याने आलेली एक पीक पध्दती व त्याचे परिणाम यावरही त्यांनी आपले निरीक्षण मांडले. आता राज्यात सर्वच भागात सर्वच पीक घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी विदर्भात घेतले जाणारे कापसाचे पीक आता राज्याच्या अन्य भागातही घेतले जाते असे सांगून सफरचंद सोडले तर सर्वच फळ भाजी, धान्य पीक राज्यात घेतले जाते, देशातील अन्य राज्यात घेतल्या जाणऱ्‍या स्ट्रॉबेरीच्या उत्पादनापैकी ४५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते, असे डॉ. मुळीक यांनी अधोरेखीत केले. ड्रीप, स्प्रींकलर आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील शेती ही विकास पथावर अग्रेसर आहे. राज्यातील शेतीला उत्तम धोरणांसह योगनांची साथ लाभल्यास शेतीसह महाराष्ट्राचाही विकास होईल, असा विश्वास डॉ. मुळीक यांनी व्यक्त केला.


bottom of page