top of page
Writer's pictureMahannewsonline

खुनातील आरोपीचा जामिनावर बाहेर येताच खून...

जामीनावर सुटून आलेल्या आरोपीचा ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करुन खून केल्याची घटना लोणीकंद येथे बुधवारी रात्री सातच्या सुमारास घडली. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या वडिलांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला. सनी कुमार शिंदे (वय २२) आणि कुमार मारूती शिंदे (वय ५५, दोघेही रा. शिंदे वस्ती, लोणीकंद) अशी खून झालेल्या बापलेकांची नावे आहेत. या प्रकरणी लोणींकद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद परिसरात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सचिन शिंदे तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणात सनी शिंदेसह तिघांना अटक करण्यात आली होती. सुमारे ३ महिन्यांपूर्वी सनी शिंदे याला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता. आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील शाळेच्या मागच्या बाजूला सनी व त्याचे वडील असे दोघे चारचाकी गाडीतून निघाले होते. त्यावेळी ५ ते ६ जणांनी सनीला गाठले.

त्याच्यावर कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याचे वडिल कुमार हे मुलाला वाचविण्यासाठी धावले. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.





bottom of page