top of page

धक्कादायक ! प्रेयसीचा खून करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला, अन् काही तासांनंतर लग्न

एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर तरुणाने दुसऱ्या तरुणीसह लग्नही केलं. निक्की यादव असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी साहिल गेहलोतला अटक केली आहे. साहिलने निक्कीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह तब्बल ४-५ दिवस फ्रीजमध्ये का लपवून ठेवला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा मित्राव गावाचा रहिवाशी होता. तर, निक्की हरयाणातील झज्जर येथील रहिवाशी होती. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना साहिल आणि निक्कीची पहिल्यांदा ओळख झाली होती. आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. त्यानंतर साहिल आणि निक्की हे दिल्लीतील द्वारका परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. साहिलने आपल्या प्रेमासंबंधी कुटुंबियांनी माहिती दिली नव्हती. त्यामुळे कुटुंबियांनी साहिलचे दुसऱ्या तरुणीबरोबर लग्न जमवलं होतं.

ही माहिती निक्कीला मिळाल्यानंतर तिने साहिलला काश्मीरी गेटजवळ भेटण्यासाठी बोलवलं. तेव्हा चर्चेवेळी दोघांत जोरदार वाद झाला. या वादातूनच साहिलने आपल्या कारमधील मोबाईल फोनच्या केबलच्या मदतीने निक्कीचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर साहिलने तिचा मृतदेह मित्राव गावाच्या परिसरात असलेल्या एका ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला. ९ आणि १० च्या मध्यरात्री खून केल्यानंतर साहिलने १० फेब्रुवारीला दुसऱ्या तरुणीसह लग्न केलं.

निक्कीचा नातेवाईकांशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला साहिलचा सुगावा लागला साहिलला अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने निक्कीची हत्या केल्याचे मान्य केले. त्यानंतर मंगळवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी ११.३० च्या दरम्यान ढाब्यातील फ्रीजमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला. साहिलने निक्कीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह तब्बल ४-५ दिवस फ्रीजमध्ये का लपवून ठेवला, याचा शोध पोलीस घेत आहेत. श्रद्धा वालकर प्रमाणे या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा साहिलचा विचार होता का? या संदर्भात साहिलची चौकशी केली जात आहे.


bottom of page