top of page
Writer's pictureMahannewsonline

दुहेरी हत्याकांड ! माय-लेकरांचा निर्घृण खून; मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकले

पुणे : धानोरी परिसरात राहणाऱ्या माय-लेकरांचा खून करून, मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. महिलेचा मृतदेह पहाटे पुरंदर तालुक्यातील खळद गावच्या हद्दीत आढळून आला, तर तिच्या सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह नवीन कात्रज बोगदा परिसरात जांभुळवाडी येथे महामार्गानजीक एका हॉटेलजवळ मंगळवारी सायंकाळी आढळला. सदर महिलेचा पती बेपत्ता असल्याने या हत्याकांडाचं गूढ वाढलं असून पोलीसांचा तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आयान शेख (वय ६) आणि त्याची आई आलिया आबिद शेख (वय ३५) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. तर विमा कंपनीत ब्रांच मॅनेजर म्हणून काम करणारा पती आबिद बेपत्ता आहे. या कुटुंबाने पिकनिकला जाण्यासाठी ११ जूनला कार भाड्याने घेतली होती. आबिद यांनी नंतर कारचा कालावधी वाढवून घेतला होता. सोमवारी रात्री ९ वाजता त्यांचं मध्य प्रदेशातील आपल्या कुटुंबासोबत बोलणं झालं होतं. आपण अर्ध्या तासात घरी पोहोचू असं यावेळी त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला होता.

यादरम्यान आबिदच्या कुटुंबाने सोसायटीशी संपर्क साधला असताना कार कंपनीचे कर्मचारीही तिथे आले असल्याचं त्यांना कळालं. यानंतर त्यांनी पुण्यातील नातेवाईकाशी संपर्क साधत आबिद आणि इतरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कार कंपनी कर्मचारी आणि नातेवाईकांनी जीपीसच्या सहाय्याने कारचा शोध घेतला असता सिटी प्राईड येथे पार्क केली असल्याचं आढळलं. रात्री सव्वा एक वाजता ही कार पार्क करण्यात आली होती. कारमध्ये रक्ताचे डाग दिसल्यानंतर त्यांना पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. आयानची गळा दाबून हत्या करण्यात आली असून त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. तर आलियाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. पोलीस सध्या वेगवेगळ्या ठिकाणचं सीसीटीव्ही तपासत आहे. दरम्यान आबिद अद्याप बेपत्ता असून पोलीस शोध घेत आहेत.


bottom of page