top of page
Writer's pictureMahannewsonline

धक्कादायक ! सुनेनं केला सासूचा खून, पतीच्या मदतीने लावली मृतदेहाची विल्हेवाट ...

पुणे : सासू-सुनेच्या होणाऱ्या किरकोळ वादातून रागाच्या भरात २२ वर्षीय सुनेने सासूचा ब्लाउजने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मावळ तालुक्यातील तळेगाव येथे रविवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी सून पूजा शिंदे (वय २२) तसेच तिचा पती मिलींद शिंदे (वय २९) या दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पूजा आणि तिची मयत सासू बेबी शिंदे या दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले त्यानंतर रागाच्या भरात पूजाने घरातील कापडी ब्लाउजच्या साह्याने सासू बेबी हिचा गळा आवळला. तसंच ती निपचित पडल्यावर संबंधित घटना आपला पती मिलिंद यास सांगितली. दोघांनी संगनमत करून मृत्यूमुखी पडलेल्या बेबी शिंदे हिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पोत्यात भरला आणि मृतदेह घराच्या छतावर एका कोपऱ्यात ठेवला. दोन दिवसानंतर मृतदेह कुजू लागल्याने तसंच त्याची दुर्गंधी इतरत्र पसरू लागली. त्यामुळे मृतदेह जवळच असलेल्या एका निर्जन ठिकाणी झाडा झुडपात फेकून दिला. परंतु पोत्या मधून येणाऱ्या दुर्गंधीने टेल्को कॉलनी येथील रहिवाशांचा संशय बळावला, त्यांनी तात्काळ ही घटना तळेगाव पोलिसांना कळविली.


पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत शहानिशा केली असता पोत्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला संबंधित मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर चौकशीसाठी मयत महिलेची सून पूजा शिंदे हिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तर दिली, पण सासूच्या भांडणाला आणि त्रासाला कंटाळून तिने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. या संपूर्ण प्रकरणात पती मिलिंद याचा ही सहभाग असल्याचे पूजाने पोलिसांना सांगितले. संबंधित खुना प्रकरणी मयत महिलेचा धाकटा मुलगा अमित शिंदे याने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


bottom of page