top of page
Writer's pictureMahannewsonline

... तर तुलादेखील अशीच पुरुन टाकेन; पतीची हत्या केल्यानंतर मुलीलाही दिली धमकी

सहा वर्षाच्या मुलीने आईचं कृत्य पोलिसासमोर केलं उघड

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह किचनमध्येच पुरणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सहा वर्षाच्या मुलीच्या डोळ्यांसमोर सदर महिलेने पतीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. पोलिसांनी तपासादरम्यान चौकशी केली असताना मुलीने पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितला. जर पोलिसांना सांगितलं तर तुलादेखील अशीच पुरुन टाकेन अशी धमकी आईने दिली असल्याचंही मुलीने पोलिसांना सांगितलं. रईस शेख असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर शाहिदा शेख असे आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी शाहिदा शेख आणि तिचा प्रियकर अनिकेत उर्फ अमित मिश्रा याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

शाहिदा शेखचं २०१२ मध्ये रईस शेखसोबत उत्तर प्रदेशात लग्न झालं होतं. नोकरीच्या शोधात हे दांपत्य मुंबईत आलं होतं. त्यांना सहा वर्षाची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा आहे. २५ मे रोजी शाहिदा शेख हिने दहिसर पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. २१ मे रोजी पती घऱाबाहेर पडल्यानंतर पुन्हा घऱी परतले नसल्याचं तिने सांगितलं होतं. पोलिसांनी तक्रार दाखल करत तपास सुरु केला. २५ मे रोजी रईसचा भाऊ अनीस मुंबईत पोहोचला आणि दहिसर पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी त्याने शाहिदा वेगवेगळी माहिती देत असून ती काहीतरी लपवत असल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर १ जूनला पोलीस रईसच्या घरी पोहोचले. यावेळी पोलिसांना किचनमधील टाइल्स योग्य पद्धतीने लागल्या नसून, काही टाइल्स जागेवर नसल्याचं लक्षात आलं.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता शाहिदाने हत्या केल्याची आणि मृतदेह किचनमध्ये पुरल्याची कबुली दिली. शाहिदाने शेजारील अमित मिश्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली आहे. पती रईसला याची माहिती झाल्याने त्याने तात्काळ हे सर्व थांबवण्यास सांगितलं होतं. २२ मे रोजी शाहिदाने अमित मिश्रासोबत मिळून मुलीच्या डोळ्यांदेखत रईसची वायरीने गळा दाबून हत्या केली. यानंतर त्यांनी मृतदेहाचे तीन भाग केले आणि तो किचनमध्ये पुरला. किचनमध्ये तीन फूट खट्टा खोदून पुरण्यात आलेला हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस जवळपास १२ तास खोदकाम करावे लागले.


bottom of page