top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा केला बनाव; तपासात मात्र...

पुणे : २४ मे रोजी घरात मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गौरव मंगेश सुतार (रा. उत्तमनगर, मंतरवाडी), अश्विनी मनोहर हांडे अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. तर मनोहर नामदेव हांडे (रा. उरुळी कांचन) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी आणि प्रियकराला अटक केली आहे.

मनोहर हांडे हा त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. त्याची पत्नी अश्विनी हिने पतीला कोरोना झाल्याचे सांगून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला आकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर आणि पोलिस कर्मचारी दिगंबर साळुंखे यांना या प्रकरणाचा संशय आला असता त्यांनी अधिक तपास केला, तेव्हा अश्विनी आणि गौरव सुतार यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी अनैतिक संबंधातून मनोहर हांडे याचा खून केल्याचे कबूल केले.

अश्विनी आणि गौरवचे 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते. हा प्रकार मनोहरला समजला होता. 15 दिवसांपूर्वी मनोहरला कोरोना झाला. तो घरीच उपचार घेत होता. दरम्यान, 24 मे रोजी रात्री गौरवने तिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. अश्विनीने दुधातून त्या गोळ्या पतीला दिल्या. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला. नंतर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आईला पती झोपेतून उठत नसून कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.


bottom of page