top of page
Writer's pictureMahannewsonline

अवघ्या १०० रुपयांसाठी केली मित्राची हत्या

अवघ्या १०० रुपयांसाठी मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील दहिसर परिसरामध्ये घडली. आरोपीने हत्या केल्यानंतर फोन करुन चुकीची माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत अधिक माहिती अशी, ४ फेब्रुवारी रोजी रात्री १२ च्या सुमारास परमेश्वर कोकाटे याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन गॅरेजमध्ये एक व्यक्ती जळलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती दिली.त्यानंतर दहिसर पोलीस स्थानकातील पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पोलीस नियंत्रण कक्षामध्ये फोन करणारा मित्र परमेश्वर कोकाटे यानेच राजू पाटील याची हत्या केल्याची माहिती समोर आली.


राजू आणि परमेश्वर ४ फेब्रुवारीच्या रात्री गॅरेजमध्ये बसले होते. या दोघांमध्ये १०० रुपये देण्याघेण्यावरुन वाद झाला. यावेळी दोघांमध्ये झटापटी झाली. रागाच्या भरात परमेश्वरने तेथेच पडलेल्या प्लॅस्टीकच्या नळीने राजूचा गळा आवळून त्याची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी राजू जळल्याचा बनाव परमेश्वरने रचला होता.

पोलिसांनी परमेश्वरला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


bottom of page