अतिवृष्टीने शहरात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत करा : गिरीश महाजन
पालकमंत्र्यांकडून शहरातील अनेक वस्त्यांची पाहणी
नांदेड महानगर व जिल्ह्यामध्ये एक व तीन सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीने शहराच्या अनेक भागात नुकसान झाले आहेत. ज्यांची नुकसान झाले ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले अशा सर्व लोकांना तातडीची मदत करा असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.
लातूर येथील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी लातूर व नांदेड दोन्हीही ठिकाणी नुकसान झालेल्या क्षेत्रात जाऊन पाहणी केली. मंगळवारी त्यांनी लोहा तालुक्यातील नुकसानाची पाहणी केली त्यानंतर काल राष्ट्रपती महोदयांच्या दिल्ली येथील प्र स्थानानंतर रात्री उशिरा त्यांनी शहरातील ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले,त्या भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
महानगरातील गाडीपुरा भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, उपायुक्त गिरीश कदम यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, अनेक घरांची पडझड झाली. या भागातील नागरिकांसोबत, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. पूर परिस्थिती नंतर प्रशासनाकडून कोणती तत्कालिक व्यवस्था झाली याबाबत ही माहिती घेतली. तसेच राहण्यायोग्य घरे होईपर्यंत ज्यांना ज्यांना निवारा दिला आहे त्यांना तातडीची मदत करण्याचे ही त्यांनी यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांना आदेश दिले.
राज्य शासनाने तातडीच्या मदतीचे सर्व निकष बदलले असून नव्या निकषानुसार तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. निवारा भोजन व अन्य व्यवस्था करून देण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महानगरपालिका व शहरातील पंचनामांचे काम युद्ध पातळीवर करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. एक-दोन दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे पंचनाम्याला वेळ झाला तरी प्रत्येक नुकसानग्रस्त घराची पाहणी करण्याबाबतही त्यांनी स्पष्ट केले.
नदीकाठच्या वस्त्यांमध्ये झालेले नुकसान व त्यावरच्या कायमस्वरूपी तोडग्याबाबत महानगरपालिका करत असलेल्या उपाययोजना त्यांनी जाणून घेतल्या. अधिक गतीने कामे करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.