top of page
Writer's pictureMahannewsonline

समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना मिळणार ऑनलाईन प्रशिक्षण

पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे यांच्यावतीने राज्यातील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाचे पायाभूत प्रशिक्षण ऑनलाईन देण्यात येणार आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमधील कामाचा दर्जा व गुणवत्ता वाढीला लागावी. प्रशासनात गतिमानता व सुधारणा व्हावी. या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात कर्मचारी अधिकारी यांनी देखील काळानुरूप आपल्या कामकाजामध्ये बदल करणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच त्याचे प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे बाब लक्षात घेत त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत नुकतेच विविध संवर्गातील निलंबित असलेले कर्मचारी यांच्या सेवा प्रस्थापित केले आहेत. यापूर्वी देखील 11 कर्मचाऱ्यांच्या सेवा पुनर्स्थापित करण्यात आलेल्या आहेत. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुला-मुलींच्या निवासी शाळेतील 21 कर्मचाऱ्यांचा देखील नियमित वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. आयुक्तालयाने कर्मचाऱ्यांच्या हिताचे घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.

समाज कल्याण विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी समाज कल्याण विभागाने कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास, झिरो पेंडन्सी, विविध संवर्गाचे प्रशिक्षण, यासारखे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षापासून निलंबित असलेल्या सर्व सेवा पुनर्स्थापित केलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना समाज कल्याण विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले आहे.


bottom of page