'श्री दत्त महात्म्य कथामृत ' ग्रंथास वाचकांचा भरभरून प्रतिसाद
नाशिक : नुकत्याच परशुराम सायखेडकर नाट्य मंदिरामध्ये झालेल्या श्री दत्त सेवा समितीच्या व्याख्यानमालेत पत्रकार लेखक पद्माकर देशपांडे यांच्या 'श्री दत्त महात्म्य कथामृत' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ख्यातनाम कीर्तनकार ह भ प राठी महाराज, त्र्यंबकेश्वर येथील स्वामी कंठानंद महाराज व गुजरात मधील श्री साई दास महाराज यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. श्री दत्त सेवा समितीचे प्रभाकर पाठक, सौ तृप्ती स्वर्गे, भूषण देशपांडे, हरिदास यशवंत आदींनी या कामी परिश्रम घेतले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पद्माकर देशपांडे म्हणाले की, हे लेखन स्वतः नृसिंह स्वामी सरस्वती यांनी केले आहे, स्वामी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी आपल्या ग्रंथात म्हटले आहे, आपल्यासारख्या सर्वसामान्य पत्रकार लेखकाकडून हे लेखन होणे हा एक दत्त महाराजांचा चमत्कारच आहे. अन्यथा कोण लिहिणारे व कोण प्रकाशन करणारे? विशेष म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध नवचैतन्य प्रकाशन तर्फे हा ग्रंथ प्रकाशित झाला असून त्याला बापूसाहेब स्वर्गे यांची प्रस्तावना आहे तसेच स्वामी अमृताश्रम यांचे आशीर्वाद लाभले आहेत. ग्रंथ प्रकाशासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार पद्माकर देशपांडे यांनी मानले. दरम्यान दत्त भक्ती विषयक या ग्रंथाला केवळ नाशिक शहरच नव्हे तर महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून मागणी येत आहे. आगामी काळात हा ग्रंथ विक्रीचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करेल अशी अपेक्षा श्रीदत्त सेवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.