top of page
Writer's pictureMahannewsonline

नाशिक जिल्ह्यातील निर्बंध अंशतः शिथिल; काय असेल सुरु, काय असेल बंद याबाबतचे सुस्पष्ट आदेश जारी

नाशिक: राज्यातील कोरोनाच्या दिलासादायक स्थितीचा विचार करून राज्य शासनाने 30 मे 2021 रोजी विविध निर्बंधांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णसंख्येचा वृद्धीदर 8.5% असून ऑक्सिजन बेडची संख्या 40% पेक्षा कमी व्यापलेले आहेत व त्यामुळे निर्बंध विषयी स्थानिक स्तरावर निर्णय घेणेबाबत मुभा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास देण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आज बैठकीमध्ये जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा सारासार विचार करण्यात आलेला असून आजपर्यंत लागू करण्यात आलेल्या निर्बंध यांची परिणामकारता तसेच भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन पूर्वीचे निर्बंध सुरु ठेवणेबाबत तसेच काही निर्बंधामध्ये द्यावयाच्या शिथिलतेबाबत निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

या बैठकीला शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड हे उपस्थित होते. त्यानंतर संदर्भात जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी म्हणून शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार व 31 मे 2021रोजीच्या राज्य शासनाने पारीत केलेले आदेशातील निर्बंध तसेच या आदेशातील लागू केलेले सर्व निर्बंध काही अटी व शर्तींचे अधीन राहुन जून, 2021 रोजी सकाळी 07.00 ते 15 जून, 2021 सकाळी 07.00 वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. या आदेशात "सुरू करण्यासाठी पात्र" ज्या ज्या बाबींचा नव्याने स्पष्ट उल्लेख केला आहे केवळ त्याच बाबी नव्याने सुरू करता येतील. ज्या बाबी प्रतिबंधित केल्या आहेत त्या प्रतिबंधित राहतील. ज्या बाबींचा स्पष्ट उल्लेख या आदेशात नाही त्यासाठी यापूर्वी पारित केलेल्या आदेशातील निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील.


या बाबी निर्बंधासह असतील सुरु...

  • जिल्हातील सर्व अत्यावश्यक दुकाने व आस्थापना हे सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

  • जिल्ह्यातील अत्यावश्यक नसलेली अन्य एकल दुकाने ( शॉपिंग कॉम्पलेक्स्, मॉल वगळून ) सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजे पर्यंत सुरु राहतील.

  • वरील दुकाने व आस्थापना या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक विषयक काळजी घेणे अत्यावश्यक राहील. सर्व कर्मचाऱ्यांचे दैनंदिन शारीरीक तापमान नोंदवणे तसेच वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करण्यास बाध्य करण्याची जबाबदारी आस्थापना चालकांची राहील. कोणत्याही कर्मचाऱ्यास कोरोना सदृष्य कोणतेही लक्षणे दिसून येत असल्यास अशा कर्मचाऱ्यास कामाचे ठिकाणी प्रवेश न देण्याची तसेच RAT/RTPCR चाचणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना चालकाची राहील.

  • जिल्ह्यातील औद्योगिक अस्थापना काही अटी शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्यात येतील.

  • जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू करण्यात येतील.

  • दैनंदिन भाजीपाला विक्री सद्यस्थितीत सुरू असलेली स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरवून दिलेल्या ठिकाणावरून विकेंद्रित विक्री पद्धतीने सकाळी 7.00 ते दुपारी 12.00 या वेळेमध्ये सुरू राहील. भाजी खरेदीसाठी होणारी रोजची गर्दी टाळण्याच्या दृष्टीने भाजी मार्केट सध्या प्रमाणेच बंद राहतील.

  • दूध व वृत्तपत्र विक्रीसाठी सद्यस्थितीत दिलेली सवलत व वेळेची मर्यादा तशीच सुरू राहील.

  • हॉटेल्स, रेस्टाँरेट, फुड स्टॉल, खानावळ, महामार्ग व रस्ता लगतची ढाबे व रेस्टाँरट तसेच मद्य विक्री संदर्भात शासकीय अधिसूचनेनुसार सध्याची प्रचलित पद्धत तशीच पुढे सुरु राहील. खाद्य पदार्थ व पार्सल व होम डिलिव्हरी बाबत सकाळी 07.00 ते दुपारी 01.00 आणि सायंकाळी 05.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुरु राहतील. तथापि उपरोक्त ठिकाणी बसून अन्न पदार्थ सेवन करण्यास प्रतिबंध असेल.

  • केवळ निवासी व्यक्तींकरिता हॉटेल व रेस्टाँरट मधील अन्न पदार्थ त्याठिकाणी सेवन करण्यास मुभा राहील.

  • प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी सर्व दुकाने व आस्थापना संपुर्णत: बंद राहतील. फक्त वैद्यकिय सेवा व मेडीकल दुकाने, दुध/वृत्तपत्रे विक्री, भाजीपाला व फळांची दुकाने सुरु राहतील. तसेच हॉटेल्स व रेस्टाँरट, फुड स्टॉल्स मधील अन्न पदार्थांची फक्त होम डिलिव्हरी सेवा सुरु राहील.

  • शासकीय स्वस्त धान्याची दुकाने शासकीय वेळेप्रमाणे वेळेत सुरु राहतील.

  • शिवभोजन थाळी केंद्र सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेमध्ये सुरु असतील. तथापि, सदर केंद्रावर केवळ पार्सलद्वारे अन्न पदार्थांचे वितरण होईल आणि सदर ठिकाणी बसून भोजन करणे प्रतिबंधित राहील.

  • अत्यंविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्ती व तद्नंतरचे विधीसाठी जास्तीत जास्त 15 व्यक्तींची उपस्थिती मर्यादा असेल.

  • अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेल्या वस्तूंची ई-कॉमर्स पध्दतीने विक्री चालू राहील.

  • कोविड-19 व्यवस्थापनाशी निगडीत नसलेल्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये 25% उपस्थिती राहील. त्यापेक्षा अधिक उपस्थिती ठेवावयाची झाल्यास पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.

  • कृषी विषयक साहित्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी 04.00 या वेळेत सुरु राहतील.

  • बँकां, पतसंस्था व पोस्ट ऑफिसचे नियमित कामकाज सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सुरु राहील.

  • मुद्रांक व नोंदणी विभागाचे अंतर्गत दस्त नोंदणीचे कामकाज पूर्ववत सुरु राहील.

  • पेट्रोल व डिझेल, स्वंयपाकाचे गॅस संबंधित सर्व कामे अत्यावश्यक सेवेप्रमाणे सुरु ठेवण्यास मुभा राहील.

  • शासकीय यंत्रणामार्फत मान्सूनपुर्व विकासकामे, पाणी पुरवठा व टंचाई विषयक कामे सुरु राहतील.

  • सर्व सार्वजनिक, खाजगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने नागरिकांना परवानगी दिलेल्या कामासाठी अनुज्ञेय राहील. तथापि, यासाठी पुर्वी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक राहील.

  • मालवाहतूक, रुग्ण वाहतूक यापुर्वीचे दिलेल्या निर्देशाप्रमाणे सुरु राहील. नागरिकांना अत्यावश्यक वैद्यकीय कारणाकरीता व इतर परवानगी दिलेल्या बाबींकरीता जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील प्रवास करावयाचा असल्यास covid19.mhpolice.in या बेबसाईट वरुन ई-पास प्राप्त करुन प्रवास करता येईल.


या आहेत प्रतिबंधित असलेल्या बाबी...

  • सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, लग्न व अनुषंगिक कार्यक्रम, हॉल, मंगल कार्यालय, लॉन्स व तत्सम ठिकाणे बंद राहतील. परंतु पाच व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणी करणे अनुज्ञेय राहील.

  • सर्व चित्रपट गृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, करणमणूक केंद्रे, नाट्यगृह, कलाकेंद्रे, प्रेक्षक गृहे, सभागृहे व सर्व शॉपिंग मॉल्स् संपुर्णत: बंद राहतील.

  • सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळया जागा, पार्क, उद्याने व बगीचे पुर्णत: बंद राहतील.

  • सर्व प्रकारचे शाळा, कॉलेजेस्, कोचिंग क्लासेस् बंद राहतील व पुर्वीप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने सुरु राहतील. तथापि, शासनाने व अखत्यारीत संस्थांनी वेळोवेळी परवानगी दिलेल्या परीक्षा व प्रशिक्षिण घेण्यास परवानगी राहील.

  • दुपारी 03.00 वाजेनंतर ते सकाळी 06.00 वाजेपर्यंत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई असेल. अत्यावश्यक व अनुज्ञेय बाबींशी निगडीत संबंधित व्यक्तींनी बाहेर पडतांना ओळखपत्र/कागदपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.

या आदेशात सुरु करण्यासाठी पात्र ज्या-ज्या बाबींचा नव्याने स्पष्ट उल्लेख केला आहे केवळ त्याच बाबी नव्याने सुरु करता येईल ज्या बाबी प्रतिबंधित केल्या आहेत. त्या प्रतिबंधित राहतील. ज्या बाबींचा स्पष्ट उल्लेख या आदेशात नाही त्यासाठी यापुर्वी पारीत केलेल्या आदेशातील निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील.


मुभा दिलेल्या सर्व आस्थापनामध्ये कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि Covid-19 Appropriate behaviour चे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. याबाबत मार्गदर्शक सूचना व निर्देशांचे भंग केल्याचे आढळून आल्यास संबंधित ठिकाणी आस्थापना धारकास 5000 रु. दंड आणि संबंधित उपस्थित ग्राहकास प्रति व्यक्ती 1000 रु. दंड आकारण्यात येईल. तसेच दुसऱ्यांदा नियमाचा भंग करणाऱ्या आस्थापनेविरुद्ध कोविड 19 ची अधिसूचना लागू असेपर्यंतच्याकालावधीसाठी बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल,असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.


आदेशात नमुद सर्व आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक सर्व सूचनांची योग्य दक्षता घेणे अनिवार्य राहील. तसेच यापैकी जास्तीत जास्त व्यक्तींची वेळोवेळी कोरोना विषयक RAT/RTPCR चाचणी करुन घ्यावी, असेही संबंधित आस्थापना चालकांना या आदेशात जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सूचित करण्यात आहे.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उपरोक्त आदेश अंमलबजावणीबाबत दर शुक्रवारी आढावा घेण्यात येईल आणि त्याअनुषंगाने जिल्हयातील कोविड-19 रुग्ण संख्येत वाढ किंवा घट होईल त्याप्रमाणे निर्बंधामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येतील .सर्व संबंधित विभागांनी उपरोक्त आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा, 1897 आणि भारतीय दंड संहिता 1860 तसेच यासंदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्याव,असेही या आदेशात जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी नमूद केले आहे.

उद्योगांनी ही घ्यावी दक्षता...

1. शासन अधिसूचने मध्ये अनुज्ञेय असलेल्या औद्योगिक आस्थापना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे यथोचित पालन करून शासन अधिसूचनेतील सर्व नियमांचे अधीन सुरु राहतील.

2. वरील प्रमाणे औद्योगिक आस्थापना सुरू करतांना सर्व कर्मचाऱ्यांना फोटो सहित ओळखपत्र संबंधीत आस्थापनाने तातडीने तयार करून द्यावे. ज्या-ज्या वेळेला आस्थापनांची तपासणी केली जाईल अथवा संबंधित कर्मचारी प्रवास करताना आढळून येतील त्यावेळी असे ओळखपत्र संबंधित कर्मचाऱ्याकडे असणे अनिवार्य राहील.

3. आस्थापनेमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांची RT-PCR अथवा RAT चाचणी 15 दिवसांचे आत करून घेणे संबंधित आस्थापनेवर बंधनकारक राहील.

4. वरील मुद्दा क्रमांक 2 बाबत पूर्तता व मुद्दा क्रमांक 3 बाबत कार्यवाही सुरू केली असल्याबाबतचा अहवाल प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक यांचे कार्यालयाकडे तात्काळ सादर करावा लागेल.

5.कामावर येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची दररोज तापमान चाचणी करून त्याची नोंद ठेवणे आस्थापनेवर बंधनकारक राहील.

6. लसीकरणाच्या उपलब्धतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांचे यथाशीघ्र लसीकरण करून घेणे आस्थापनेवर बंधनकारक राहील.

7. आस्थापनेमध्ये कोरोना प्रतिबंधक सर्व उपायांचे परिपूर्ण पालन करून घेणे आस्थापनेवर बंधनकारक राहील.

8. वरील पैकी कोणतेही मुद्दांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास संबंधित अस्थापना कोरोना विषयक अधिसूचना मागे घेतली जाईपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी अशी घ्यावी दक्षता...

1. आस्थापने मध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांची RT-PCR अथवा RAT चाचणी 15 दिवसांचे आत करून घेणे संबंधित आस्थापनेवर बंधनकारक राहील.

2. बाजार समिती आवारात प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट असावे.

3. संपूर्ण बाजारात दररोज नियमितपणे सोडियम हायपोक्लोराइड ची फवारणी करण्यात यावी.

4. बाजार समिती आवारात प्रवेश करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे तापमान नोंदवण्याची तसेच संबंधित व्यक्तींनी मुख्य पट्टी योग्य प्रकारे परिधान केली आहे किंवा कसे? याची तपासणी करण्याची व्यवस्था करणे अनिवार्य राहील.

5. बाजार समितीत विविध गावांमधून व्यक्ती येत असल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने बाजारात शेतमाल घेऊन येणाऱ्या व्यक्तीं पैकी जास्तीत जास्त व्यक्तींची कोविड तपासणी करणे बाजार समितीवर बंधनकारक राहील. त्यासाठी बाजार समितीच्या आवारात RAT तपासणी करण्याची सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावी.

6. शारीरिक अंतर व कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे योग्य ते पालन होण्याच्या दृष्टीने स्थानिक जागेची उपलब्धता विचारात घेऊन किती वाहनांना व किती व्यक्तींना एकावेळी प्रवेश द्यावा याबाबत बाजार समितीने संख्या निश्चित करणे अनिवार्य राहील व त्या मर्यादेतच प्रत्यक्ष प्रवेश दिला जाईल याकरीता आवश्यक ती संपूर्ण व्यवस्था करणे बाजार समितीवर बंधनकारक राहील.

7. बाजार समितीच्या आवारात किरकोळ शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहतील.

8. बाजार समितीतील सार्वजनिक वापराची सर्व ठिकाणी उदाहरणार्थ विश्राम व्यवस्था स्वच्छतागृहे इत्यादी सुविधा येणाऱ्या व्यक्तींना गर्दी न करता पुरेशी राहील याबाबत संपूर्ण काळजी घेणे अनिवार्य राहील. त्याकरीता आवश्यकतेनुसार फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे व त्या स्वच्छतागृहांची कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने देखभाल करणे अनिवार्य राहील.

9. वरील मुद्दांची पूर्तता बाजार समिती करीत असल्याबाबत अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांचे कार्यालयाकडे तात्काळ सादर करावा.

कोरोनाचा नायनाट होईपर्यंत जनतेने निर्धार कायम ठेवावा…

गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या कमी होत असताना सुद्धा सुरू ठेवलेल्या चाचण्या व नुकताच केलेला कडक लॉकडाउन यामुळे आपला जिल्हा दहा टक्के पेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यांमध्ये दाखल झाला व आज आपल्याला अनेक उद्योग व्यवसाय सुरू करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही संधी संयमाने हाताळली तरच मागील सर्व उपाययोजनांचा उपयोग आहे अन्यथा पुन्हा आपल्याला लॉक डाऊन ला सामोरे जावे लागू शकते. या दिलेल्या शिथिलतेचा आढावा शुक्रवारी घेतला जाणार असून तोपर्यंत जर रुग्ण संख्या वाढली अथवा पॉझिटिव्हिटी रेट वाढला तर या दिलेल्या सर्व सवलती मागे घेतल्या जाणार आहेत.

या दोन तीन महिन्यात आपण चांगला संयम राखला आहे तो तसाच पुढे टिकून ठेवावा व कोरोनाचा जिल्ह्यातून पूर्ण नायनाट होईपर्यंत हा निर्धार कायम ठेवावा असे सर्व नाशिककरांना विनम्र आवाहन आहे.



bottom of page