top of page

Video: रस्त्यावर कुठंही वाहनं उभं करता? मग हे वाचाच ...

चुकीच्या पद्धतीने वाहन उभं असलेल्या वाहनाचा फोटो पाठवणाऱ्याला मिळणार ५०० रुपये

केंद्र सरकार लवकरच तसा नवा कायदा आणणार

चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर वाहन उभं करणाऱ्या वाहन चालकाकडून परिवहन विभाग १००० रुपयांचा दंड वसूल करेल. जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन उभं केलं असेल तर अशा वाहनाचा फोटो पाठवणाऱ्या नागरिकांना ५०० रुपयांचं बक्षीस मिळेल. केंद्र सरकार लवकरच असा कायदा नवा कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर लोक वाहनांसाठी पार्किंगची जागा बनवत नसल्याबद्दलही गडकरी यांनी यावेळी खंत व्यक्त केली. गुरुवारी दिल्लीमध्ये आयोजित इंडस्ट्रियल डेकार्बोनायझेशन समिटमध्ये ते बोलत होते.

“प्रत्येकजण गाडी घेत आहे. माझ्या नागपुरातील घऱी स्वयंपाक करणाऱ्याकडेही दोन गाड्या आहेत. याआधी परदेशात सफाई करणारी महिला गाडीतून यायची तेव्हा आपण आश्चर्याने पाहायचो. पण आता आपल्याकडेही तेच होत आहे. कुटुंबात चार माणसं आणि सहा गाड्या असतात. दिल्लीवाले तर नशिबवान आहेत, कारण आम्ही रस्ते त्यांच्या पार्किगसाठी तयार केले आहेत. कोणीही पार्किंग तयार करत नाही, सगळे रस्त्यावर गाडी उभी करतात,” अशी खंत यावेळी गडकरींनी बोलून दाखवली. मोठं घर बांधल्यानंतर खाली पार्किंगसाठीही जागा बनवा असा सल्ला यावेळी गडकरींनी दिला. माझ्या नागपुरातील घरी १२ गाड्यांसाठी अंडरग्राऊंड पार्किंग आहे. मी रस्त्यावर गाडी उभी करत नाही अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी एक कायदा आणणार आहे. रस्त्यावर जो गाडी उभी करणार त्याचा मोबाइलवरुन फोटो काढून पाठवल्यास दंडातील १००० रुपयांपैकी ५०० रुपये त्याला दिले जातील”. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नितीन गडकरी यांनी आपल्या युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.


bottom of page