top of page
Writer's pictureMahannewsonline

लसींच्या तुटवड्यावर गडकरींनी दिला सल्ला…

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. लस पुरवठ्यावरुन केंद्रावर सातत्याने टीका केली आहे. देशातील कोरोना व्हॅक्सिनच्या तुटवड्यावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्राला मोठा सल्ला दिला आहे. देशातील अन्य कंपन्यांनाही कोरोना लसीचा परवाना दिला पाहिजे. एका ऐवजी दहा कंपन्यांना कोरोनाची लस बनविण्याचे लायसन्स द्या, असं नितीन गडकरी म्हणाले. .

नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा सल्ला दिला आहे. “जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने ही समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनी ऐवजी आणखी १० कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्या. त्यांना देशात पुरवठा होऊ करु द्या आणि नंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करु शकतात. हे १५ ते २० दिवसात केले जाऊ शकते,” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.


प्रत्येक राज्यात दोन तीन लॅब आहेत. त्यांना व्हॅक्सिनची निर्मिती करण्याची परवानगी द्या. केवळ सेवा म्हणून व्हॅक्सिनची निर्मिती करून घेऊ नका. तर त्यांना दहा टक्के रॉयल्टी देऊन व्हॅक्सिन निर्मिती करायला सांगा, असंही ते म्हणाले.


लाकडा ऐवजी डिझेल, इथेनॉल, बायोगॅस आणि वीज आदी इंधनाद्वारे अंत्यसंस्कार केले तर अंत्यसंस्कारासाठी येणारा खर्च कमी होईल आणि लवकरात लवकर अंत्यसंस्कारही होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. बिहार आणि उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी अधिक पैसे द्यावे लागत असल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात येत आहेत. याच्या अनेक तक्रारीनंतर गडकरी यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे मांडला. रूग्णालयात ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंबद्दल त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला.


bottom of page