top of page
Writer's pictureMahannewsonline

Video पहा : नितीन गडकरींच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसमोरच सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झाली हाणामारी

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशमध्ये समोर आली आहे. भुंतर विमानतळावर कुल्लूचे पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर या दोघांमध्ये हाणामारीही झाली. हा सर्व प्रकार विमातळाच्या बाहेर झाला. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व घटना मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोर घडली. ते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या दौऱ्यानिमित्त कुल्लूला पोहचले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चार दिवसांच्या हिमाचल दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान ते बुधवारी कुल्लूला पोहचले. तिथे मुख्यमंत्री जयराम ठाकूरही उपस्थित होते. भुंतर विमानतळाबाहेर चार पदरी महामार्ग बांधण्यात येणार असल्याने या प्रकल्पाचा फटका बसलेल्या प्रकल्पग्रस्त यावेळी विमानतळाबाहेर एकत्र येऊन आंदोलन करत होते. पोलीस या आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते.

मुख्यमंत्री बाहेर येतानाच आंदोलन करताना दिसल्याने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचे प्रमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक बृजेश सूद यांचा कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्याशी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की गौरव यांनी सूद यांच्या कानशीलात लगावली. यानंतर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सूद आणि गौरव हे एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा टीममधील एकाने गौरव यांना लाथाही मारल्या. ही सर्व घटना मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोर घडली. मात्र नंतर पोलीस कर्मचारी या दोन्ही अधिकाऱ्यांना पोलिसांच्या गाड्यांमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगितले तसेच तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.



bottom of page