top of page

अंधश्रद्धेचा कळस! पाच वर्षांच्या मुलीला जीव जाईपर्यंत मारहाण

२१ व्या शतकात एकीकडे नवनवीन शोध लावले जात असताना दुसरीकडे आजही अनेकजण अंधश्रद्धेच्या आहारी जाताना दिसत आहेत. नागपूरमधून अंधश्रद्धेची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने आई-वडिलांनी मुलीची भूतबाधेतून मुक्तता करण्यासाठी केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या सुभाष नगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे आणि त्याची पत्नी रंजना चिमणे यांना पाच वर्षाची मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलगी सतत आजारी होती. तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांना शंका होती. पण त्यांनी मुलीला डॉक्टरकडे न नेता एका भोंदू बाबाच्या सल्ल्याने तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते... मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता.

शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि एका महिला नातेवाईकाने घरातच भूत बाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली मुलीला जबर मारहाण केली.यानंतर मुलगी बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळली. घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र उपचारा पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपी आई-वडीलांनी मुलीचे मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी आरोपी वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना चिमणे आणि रंजनाची बहीण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.


bottom of page