top of page
Writer's pictureMahannewsonline

२० जुलै पर्यंत लस घ्या; अन्यथा पगार स्थगित ...

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात असून प्रत्येकाने लस घ्यावी यासाठी शासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. अनेक नागरिक लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. यावर उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी " महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही तर पगार मिळणार नाही" असा आदेशच काढला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना २० जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

महानगरपालिकेत एकूण ७ हजार ४७९ अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. परंतु, वारंवार सांगूनदेखील अनेकांनी लसीकरण करून घेतलं नाही. त्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०२१ चे वेतन स्थगित करण्याबाबत विचार करण्यात येईल, असा इशाराच आयुक्तांनी दिला आहे.


काय म्हटलं आहे आदेशात
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात (शिक्षक कर्मचा-यासह) एकूण ७४७९ इतके अधिकारी व कर्मचारी कामकाज करीत आहेत. COVID-19 अंतर्गत कोरोना आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता महापालिका स्तरावर विविध उपाय योजना युध्द पातळीवर राबविण्यात येत आहेत. महापालिका अधिकारी/कर्मचारी यांचे आरोग्य निरोगी रहावे व कोरोना आजारापासुन संरक्षण मिळावे याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे (Vaccination Centre) उभारण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी लसीकरण करुन घेणेबाबत आदेश के. प्रशा/१८/कावि/२७१/२०२१ दि. ३१/०३/२०२१ व परिपत्रक के. प्रशा/१८/कावि/३६०/२०२१ दि. ०६/०५/२०२१ अन्वये वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे. तरी देखील अद्यापपर्यंत बहुतांशी अधिकारी व कर्मचारी यांनी लस घेतली नसल्याचे निर्देशनास आले आहे...
शाखाप्रमुख / विभाग प्रमुख यांना सुचित करण्यात येते की, आपल्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी / कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी (पेन्शनधारक), मानधनावरील कर्मचारी व ठेकेदार पध्दतीचे कर्मचारी यांनी जर कोविड-१९ लस अद्यापपर्यंत घेतलेली नसेल तर त्यांनी दिनांक २०/०७/२०२१ पर्यंत लस घेणेची कार्यवाही पुर्ण करणे आवश्यक आहे.
सबब या आदेशाद्वारे मी आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, असे आदेश देत आहे की, महापालिकेतील अधिकारी / कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी व ठेकेदार पध्दतीचे कर्मचारी यांनी अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची दोन्ही डोस घेतलेले नाहीत. अशा सर्व कर्मचा-यांचे माहे जुलै २०२१ चे वेतन स्थगित करण्याबाबत विचार करण्यात येईल. त्यानुसार अशा सर्व कर्मचा-यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेची कार्यवाही दि. २०/०७/२०२१ पर्यंत पूर्ण करणेत यावी. तसेच सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या बाबतीत लेखा विभागाकडून संबंधीतांस कळविण्यात यावे.

bottom of page