top of page
Writer's pictureMahannewsonline

देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेरील आजचं आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेतलं असलं तरी ...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापुढे करण्यात येणारं आदोलन काँग्रेसने स्थगित केलं आहे. सोमवारी सकाळी आंदोलन करण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आली होती. यानंतर भाजपानेही हिंमत असेल तर येऊन दाखवा, जशास तसे उत्तर दिले जाईल, असं आव्हान दिलं होतं. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन स्थगित केलं असल्याचं काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं. आजचं आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेतलं असलं तरी पंतप्रधानांनी माफी मागावी या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला असून त्यांनी माफी मागेपर्यंत भाजपा नेते, आमदार, खासदारांच्या घरापुढे, भाजप कार्यालयांपुढे आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. भाजपा कार्यालयांपुढे निदर्शने झाल्यावर सोमवारी फडणवीस यांच्या निवासस्थानापुढे आंदोलन केलं जाणार होतं. नाना पटोले आंदोलनासाठी निघाले असताना पोलिसांनी अडवल्यावर त्यांनी पायी जाण्याची तयारी दर्शवली होती. यावेळी पोलिसांनी त्यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सांगत आंदोलन न करण्याची विनंती केली.

यानंतर नाना पटोले यांनी तिथे उपस्थित प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, ““महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांचा, विचारांचा अपमान नरेंद्र मोदींनी केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला असून आम्ही त्याचा निषेध करतो. भाजपानेच लोकांना रस्त्यावर आणले असून भाडोत्री लोकं उतरवली आहेत. त्यांनीच रस्ता जाम केला. ही महाराष्ट्रद्रोही भाजपा असल्याचं यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे. त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागत आहे. आजचं आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेत आहोत. पण हे आंदोलन सर्व खासदारांच्या घरासमोर आंदोलन सुरु ठेवण्याची भूमिका स्पष्ट आहे,” असं नाना पटोले म्हणाले.



bottom of page