top of page
Writer's pictureMahannewsonline

मी काय तुम्हाला नॉर्मल माणूस वाटलो का?

चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यात वातावरण चांगलच तापलं असून ठिकठिकाणी शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळी नारायण राणे यांनी चिपळूणमध्ये माध्यमांशी संवाद साधला. " माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, मी काय तुम्हाला नॉर्मल माणूस वाटलो का? अशा शब्दांत आपला संताप यावेळी राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी नारायण राणे यांना अटकेच्या आदेशासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन असा इशारा यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला.

“आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारुन गेले असतील तर त्यात पुरुषार्थ नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी नाशिकमधील तोडफोडीच्या घटनेवर दिली. “ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याचं वक्तव्य केलं होतं तेव्हा तो गुन्हा नव्हता का? मग त्यावेळी गुन्हा दाखल का झाला नाही?,” अशी विचारणा नारायण राणेंनी केली.


पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी अशा शिवसैनिकांना भीक घालत नाही. कोण आहेत ते…समोर उभं तरी राहावं”. “पोलिसांनी पत्र दिलं नसून नोटीस दिली आहे, त्यात फरक आहे. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे यात्रा होणार आहे , असं नारायण राणे म्हणाले आहेत.

“पोलिसांची तत्परता आदेशामुळे आहे. आमचं पण सरकार वरती आहे. हे कुठपर्यंत उडी मारतात पाहूयात”. जन आशीर्वाद यात्रा वेळापत्रकाप्रमाणे जाणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच मी शिवसेनेच्या आक्रमकतेला जुमानत नाही. आम्ही डबल आक्रमक आहोत असं यावेळी ते म्हणाले. नारायण राणेंनी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली अशी टीका यावेळी त्यांनी केली.


bottom of page