top of page
Writer's pictureMahannewsonline

Video: नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, 22 जणांचा मृत्यू

राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असताना रुग्णालयात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात येत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असतानाच नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन या रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. दरम्यान मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक शहरातील जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेल्याची घटना आज दुपारी घडली. नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.


ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची आकडेवारी हाती आली असून यासंदर्भात सरकारला देखील माहिती कळवण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. 

रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असून रुग्णालयात सध्या 131 रुग्ण आहेत. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयातून अतिरिक्त साठा मागवण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन टँकमधून होणारी गळती थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तसंच, वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत


या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.  

दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी होत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस गर्दी कमी करत आहेत. तसंच नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे


bottom of page