top of page

अल्फा, डेल्टानंतर आता आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रोन...

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची चिन्हं दिसत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोटस्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या या नव्या B.1.1.529 व्हेरिएंटला ओमीक्रोन हे नाव दिल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेनं सांगितलं की आत्तापर्यंत B.1.1.529 या नावाने ओळखला जाणारा हा व्हेरिएंट करोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने प्रसार होणारा असून यामुळे होणारा संसर्गही गंभीर स्वरुपाचा आहे. तसंच ज्यांना आधी कोरोनाची लागण होऊन गेली आहे, त्यांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक आहे.

हा नवा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक घातक आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तज्ज्ञांनाही ओमीक्रोनच्या उगमाबद्दल ठोस अशी माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेसह बेल्जियम, बोटस्वाना, हाँगकाँग आणि इस्राइल या देशांमध्ये आढळून आल्याची माहिती हाती आली आहे.

या नव्या व्हेरिएंटबद्दल बोलताना WHO च्या मारिया व्हॅन करकोव्ह म्हणाल्या, आम्ही जगभरातल्या व्हेरिएंट्सचं निरिक्षण करत, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक प्रणाली कार्यान्वित केली आहे. ओमीक्रोन व्हेरिएंटमध्ये वेगाने म्युटेशन्स होत आहेत. त्यामुळे त्या व्हेरिएंटविरोधात लसीची परिणामकारकता शोधायला संशोधकांना काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.


bottom of page