top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोना: 18 दिवसात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मध्य प्रदेशमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून देवास जिल्ह्यातील एका कुटुंबावर कोरोनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या १८ दिवसांत कुटुंबातील ४ सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या धक्क्यानं घरच्या सुनेनं आत्महत्या केली. त्यामुळे आता कुटुंबात केवळ एक वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं आहेत.

देवासच्या मैनाश्री नगरात वास्तव्यास असलेल्या बालकिशन गर्ग यांच्या पत्नी चंद्रकला देवी यांचं सर्वात आधी कोरोनामुळे निधन झालं. १९ एप्रिलला गर्ग यांनी त्यांचा मोठा मुलगा संजय कोरोनामुळे गमावला. त्यानंतर २० एप्रिलला त्यांचा लहान मुलगा स्वप्नेशचं कोरोनामुळे निधन झालं. पत्नी आणि दोन मुलांच्या निधनामुळे गर्ग यांना धक्का बसला. घरातील सदस्यांच्या मृत्यूमुळे लहान सून रेखाला हे धक्के सहन झाले नाहीत. तिनं २१ एप्रिलला आत्महत्या करून जीवन संपवल्याने बालकिशन यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घरात केवळ बालकिशन गर्ग, त्यांची मोठी सून रितू आणि चार लहान लहान मुलं राहिली. मात्र रितू गर्ग यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना इंदूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवघ्या १८ दिवसांत एकाच कुटुंबातील ५ सदस्यांच्या मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


bottom of page