top of page
Writer's pictureMahannewsonline

जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

सातारा: जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाचा आढावा देसाई यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता रेमडेसिवीर औषधांचा अधिकचा पुरवठा जिल्ह्यासाठी व्हावा यासाठी शासनाला पत्र द्या. सध्या जिल्ह्यात 3 हजार ऑक्सिजन बेड व 200 व्हेंटिलेटर आहेत. भविष्याचा विचार करुन ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढवली पाहिजे असे देसाई यांनी सांगितले.

शासनाने लॉकडाऊन किंवा आणखी कडक निर्बंध जाहीर केले तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी गृह विभागाने मनुष्यबळ तयार ठेवावे. तसेच नागरिकांनी मास्कचा, वेळोवेळी सॅनिटायझरचा, सुरक्षित अंतर याचे पालन केले पाहिजे याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असेही आवाहन देसाई यांनी शेवटी केले.

bottom of page