top of page
Writer's pictureMahannewsonline

औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर बंदी

कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अनेक राज्यांमधून मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने राज्यांनी केंद्राकडे मदत मागितली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर बंदी आणली असून यामधून नऊ उद्योगांना वगळण्यात आलं आहे. या निर्णयाची २२ एप्रिलपासून अमलबजावणी होणार आहे.

रविवारी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून औद्योगिक कारणासाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यास सांगितलं आहे. दरम्यान यामधून नऊ उद्योगांना सूट देण्यात आली असून एमपॉल्स व वायल्स, फार्मास्युटिकल, पेट्रोलियम रिफायनरीज, स्टील प्लांट्स, अणुऊर्जा सुविधा, ऑक्सिजन सिलिंडर उत्पादक, सांडपाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प, अन्न व जल शुद्धीकरण, प्रक्रिया उद्योग प्रक्रिया उद्योग यांना यातून सूट देण्यात आली आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यातून मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने गठीत केलेल्या ग्रुपने औद्योगिक वापरासाठी होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा, देशातील वाढती मागणी पूर्ण करण्याच्या तसंच जीव वाचवण्याच्या दृष्टीने आढावा घेतला आहे,” असं अजय भल्ला यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी २२ एप्रिलपासून ते पुढील आदेशापर्यंत औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.


bottom of page