उजनी धरणातून 1 लाख 25 हजार तर वीरमधून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी
पंढरपूर : उजनी धरण व वीर पाणलोट क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून सायं.5.00 वाजता 1 लाख 25 हजार क्युसेकचा तर वीरधरणातून 33 हजार 609 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे.
संगम येथून दुपारी 3.00 वाजेपर्यंत 1 लाख 37 हजार 860 क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. भीमा नदी पात्रातील वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंद्रभागा नदी पात्रात सध्या 59 हजार 222 क्युसेक पाणी वहात आहे. संगम येथून येणाऱ्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी पात्रात रात्री 8.00 वाजले नंतर सुमारे 1 लाख 37 हजार क्युसेकने पाणी वाहणार आहे.
भीमा नदीवरील पंढरपूर तालूक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर,मुंढेवाडी, पूळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरुन होणारी वाहतूक बंद राहणार आहे.चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात कोणीही उतरु नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलअधिकारी, पोलीस पाटील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनही उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.