top of page

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; परशुराम घाटात दरड कोसळली

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मातीसह दरड कोसळली आहे. यामुळे वाहतूकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी पोहचले आहेत. पर्यायी वाहतूक लोटे चिरणी कळबस्ते मार्गे वळवण्यात आली आहे. तर महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

रत्नागिरी व रायगड जिल्हयाला गेले चार दिवस मुसळधार पावसाने झोडपले असून परशुराम घाटात दरड कोसळल्याने शनिवारी रात्री उशिरा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घाटातील दरडींमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने यात अन्य कोणतीही हानी झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे प्रांताधिकारी प्रविण पवार आणि तहसीलदार जयराज सूर्यवंशी, महसूल विभागाचे कर्मचारी प्रसन्न पेठे आदी घटनास्थळी दाखल झाले असून रात्री १२:३०च्या सुमारास या महामार्गावरील माती हटवण्यात आली आहे. पण याच ठिकाणी आणखी काही दरडींचा भाग खाली येऊ शकतो. म्हणून तूर्तास तरी या परशुराम घाटातील वाहतूक चिरणी मार्गे वळवण्यात आली आहे.


bottom of page