top of page

‘बेशरम रंग’ गाण्यातील भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद; सेन्सॉर बोर्डाचा मोठा निर्णय


अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारी २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घाललेल्या भगव्या रंगाची बिकिनीमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. याविरोधात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या गाण्यात आणि चित्रपटात काही बदल सुचवले आहेत.

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार, “हा चित्रपट नुकताच सीबीएफसी समितीकडे प्रमाणपत्रासाठी दाखवण्यात आला. यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याचे परीक्षण करण्यात आले. यावेळी परीक्षक समितीने निर्मात्यांना गाण्यांसह चित्रपटात काही बदल करण्याचे सुचवले आहे. हे सुचवलेले बदल अंमलात कसे आणावे, यासाठी मार्गदर्शनही केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची सुधारित आवृत्ती सेन्सॉरकडे सादर करावी”, असे आदेशही सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.

दरम्यान शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


bottom of page