top of page

Video : पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी केले देशाला संबोधित

देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदीन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर प्रहार केला. याचबरोबर भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अनके विषयांवर प्रकाश टाकला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी

  • भारतातच नाही तर जगभरात कानाकोपऱ्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे. संपूर्ण जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानानं फडकतोय. जगभरात पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • 'संपूर्ण गुलामगिरीचा काळ स्वातंत्र्याच्या लढ्यात घालवला. भारताचा असा एकही कोपरा नाही जिथे लोकांनी शेकडो वर्ष गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही. त्याग केला नाही. आज आपण सर्व देशवासियांना प्रत्येक महापुरुषांना, त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्याची संधी आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घेण्याची ही संधी आहे.'

  • 'मंगल पांडे, तात्या टोपे, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल आणि ब्रिटीश राजवटीचा पाया हादरवणाऱ्या आपल्या असंख्य क्रांतिकारकांचा देश कृतज्ञ आहे.

  • नव्या निर्धारानं नव्या दिशेनं वाटचाल करण्याचा दिवस आहे.

  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पहिल्यांदाच देशभरात एवढा मोठा उत्सव साजरा केला जात आहे. मार्च २०२२ पासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात झाली. यामध्ये देशभरात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

  • येत्या काळात आपण 'पंचप्राण'वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यामध्ये पहिले - विकसित भारताचे मोठे संकल्प आणि संकल्प घेऊन पुढे जा; दुसरे - गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका; तिसरे - आपल्या वारशाचा अभिमान बाळगा; चौथे - एकतेचे सामर्थ्य आणि पाचवे - नागरिकांची कर्तव्ये ज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल.

  • आत्मनिर्भर भारत, ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची, समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आत्मनिर्भर भारत, हा सरकारचा अजेंडा किंवा सरकारी कार्यक्रम नाही. हे समाजाचं जनआंदोलन आहे, जे आपल्याला पुढे न्यायचं आहे.

  • आपण 'डिजिटल इंडिया' उपक्रम पाहत आहोत, देशात स्टार्टअप वाढवत आहेत आणि टियर २ आणि ३ शहरांमधून भरपूर प्रतिभा समोर येत आहेत. आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा'

  • भारतात काही लोक गरिबीशी लढत आहेत. काही लोकांकडे राहण्यासाठी घर नाही. तर दुसरीकडे काही लोकांकडे चोरी केलेला माल लपवण्यासाठी जागा नाही. हे योग्य नाही. याच कारणामुळे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढायचे आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. मला आशीर्वाद द्या. ही लढाई लढण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. गेल्या आठ वर्षांत, आम्ही थेट लाभ हस्तांतरण करून दोन लाख कोटी रुपयांची बचत केली आहे. हा पैसा चुकीच्या हातात जायचा. पूर्वीच्या सरकारांमध्ये बँका लुटून पळून गेलेल्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • घराणेशाही हादेखील एक मुद्दा आहे. घराणेशाहीमुळे गुणवत्तेला वाव मिळत नाही. घराणेशाही, परिवारवाद हादेखील भ्रष्टाचारास कारणीभूत ठरतोय. घराणेशाहीच्या राजकारणाला देशाशी काही देणघेणं नसतं. याच कारणामुळे देशातील राजकारण शुद्धीसाठी घराणेशाहीच्या मानसिकतेला दूर करून गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पूर्ण भाषण येथे ऐका.





bottom of page