top of page
Writer's pictureMahannewsonline

वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला खुर्चीत दोरीने बांधले!

भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

जळगाव : शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या कारणावरून भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलकांनी जळगाव महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांना त्यांच्या खुर्चीवर दोरीने बांधले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास आमदार मंगेश चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


चाळीसगाव तालुक्यातील शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकरी शुक्रवारी दुपारी जळगाव येथील वीज कंपनीच्या कार्यालयात आले. यावेळी आमदार चव्हाण यांनी अधीक्षक अभियंत्यांना वीज कनेक्शन कट केल्याबाबत जाब विचारला. अधीक्षक अभियंत्यांनी आमदारांसह आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आमदारांनी शेख यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर वीज बिल फेकले. त्यानंतर संतप्त आमदार व आंदाेलकांनी शेख यांना त्यांच्याच खुर्चीला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर आमदारासह आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या प्रकरणी वीज कंपनीच्या अभियंत्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.


“शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे त्याविरोधात आम्ही येथे आलो आहोत. पाणी दोन दिवसांत जोडलं गेलं नाही तर हातातोंडाशी आलेलं पीक जाऊ शकतं. त्यासाठी शेतकऱ्यांसोबत आलो असता शेख यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना जागेवरच बांधून ठेवलं,” असं मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.


bottom of page