top of page

सात वर्षाच्या मुलीने वाचवले पित्याचे प्राण ....

सातारा : कराड तालुक्यातील येरवळे येथील एकाच कुटुंबातील चौघेजण दुचाकीवरून अंबवडे येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन घेऊन ते घरी परतत असताना त्यांची दुचाकी संरक्षण कठडा नसलेल्या फरशी पुलावरुन नदीत पडल्याने झालेल्या दुर्घटनेत आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यात तरबेज असलेल्या सात वर्षाच्या तनुजाला आपल्या पित्याचे प्राण वाचविण्यात यश आले. शनिवारी रात्री आठच्याच्या सुमारास कराड तालुक्यातील आंबवडे कोळे येथे ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान घटनेमुळे येरवळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शरद यादव हे आपल्या आई व दोन मुलांसमवेत दुचाकीवरून अंबवडे येथे देवदर्शनासाठी गेले होते. हे सर्वजण एकाच दुचाकीवरुन प्रवास करत होते. देवदर्शन घेऊन ते घरी परतताना वांग नदीवर असणाऱ्या फरशी पुलावरून त्यांची दुचाकी घसरली. त्याठिकाणी जुन्या पुलाचे बांधकाम सुरु असून खडी व वाळू त्याठिकाणी पसरली आहे. त्यामुळे त्यांची गाडी घसरून चौघेही दुचाकीसह साधारण 20 फुट खोल नदीत पडले अणि बुडाले. तिघांनाही पोहता येत नव्हते. प्रसंगावधान राखून पोहण्यात तरबेज असलेल्या सात वर्षाच्या तनुजाने बुडत असलेल्या आजीला अणि भावाला ओढत आणुन पाण्याबाहेर काढले. काठावर आणले. पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून वडिलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी ती पुन्हा पाण्यात गेली. वडिलांना बाहेर काढत असताना तोवर काठावरील आजी अणि भाऊ पुन्हा घसरून पाण्यात पडोळ्याने आजी अणि भावाचा दुर्दैवी मृत्यु झाला.



केवळ सात वर्षाच्या मुलीने जिवाची पर्वा न करता तिघाचाही जीव वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले खरे मात्र तिच्या धडपडीला पुर्णत: यश आले नाही. मालन भगवान यादव (वय 57), पियुष शरद यादव (वय 4, रा. येरवळे ता. कराड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची कराड पोलिसात नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.


bottom of page