top of page

‘झुंड’ चित्रपटातील अभिनेत्याला चोरीच्या आरोपाखाली अटक

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला अटक करण्यात आली आहे. नागपूर शहर पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली त्याला बेड्या ठोकल्या आहेत. प्रियांशूने ‘झुंड’ चित्रपटात बाबू ही भूमिका साकारली होती.

काही दिवसांपूर्वी नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी प्रदीप मोंडावे यांच्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होते. याप्रकरणी मोंडावे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचा दावा त्याने केला.

यानंतर नागपूर शहर पोलिसांनी मंगळवारी १८ वर्षीय प्रियांशू क्षत्रियला अटक केली. प्रियांशू क्षत्रियला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात एका कबुतराच्या पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रियांशू क्षत्रिय याला यापूर्वी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रियांशू क्षत्रियने बाबू नावाचे पात्र साकारले होते. “अरे क्या फुर्र फुर्र कर रहा है? इधर क्या खजाना वजाना गाडा है क्या?”, हा त्याचा डायलॉग फारच लोकप्रिय ठरला होता.


bottom of page