top of page

IAS महिला अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा, १९.३१ कोटींची रोकड जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी बिहार, झारखंडमध्ये मोठी कारवाई करत झारखंडच्या खाण आणि उद्योग सचिव पूजा सिंघल आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर एकाच वेळी छापे टाकले. छाप्यादरम्यान पूजा सिंघल यांचे पती आणि व्यावसायिक अभिषेक झा यांच्या सनदी लेखापालकडून १९ कोटी ३१ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणांहून १५० कोटींहून अधिक गुंतवणुकीची कागदपत्रेही सापडली आहेत. शुक्रवारी पहाटे सुरू झालेली ईडीची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरुच होती.

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पथकांनी सकाळी सहा वाजल्यापासून छापे टाकण्यास सुरुवात केली. नवी दिल्ली, मुंबई, जयपूर, फरीदाबाद, गुरुग्राम, मुझफ्फरपूर, रांची आणि इतर शहरांमध्ये हे छापे टाकण्यात आले. .ईडीच्या वेगवेगळ्या पथकांनी पूजा सिंघल यांचे रांची येथील अधिकृत निवासस्थान, कानके रोडवरील पंचवटी रेसिडेन्सीच्या बी ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक १०४, सीए सुमन कुमार यांचे कार्यालय आणि निवासस्थान, पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे पल्स हॉस्पिटल, सासरे कामेश्वर यांच्यावर छापे टाकले. झा यांचे मुझफ्फरपूर, मिठनपुरा येथील निवासस्थान, पूजा सिंघल यांचा भाऊ आणि आई-वडिलांचे निवासस्थान, सीएचे एंट्री ऑपरेटर रौनक आणि प्राची अग्रवाल यांच्या कोलकात्यात, राजस्थानचे माजी सहाय्यक अभियंता राजेंद्र कुमार जैन यांच्या जयपूर येथील निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.



कोण आहेत पूजा सिंघल?

पूजा सिंघल २००० बॅचच्या झारखंड कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत.. वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांनी देशातल्या सर्वात प्रतिष्ठित अशा UPSC परीक्षेत यश मिळवल्याने त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. सिंघल यांनी मागच्या भाजपा सरकारमध्ये कृषी सचिवपासून सध्याच्या सरकारमध्ये पर्यटन आणि उद्योग सचिव अशा अनेक प्रमुख पदांवर काम केलं आहे. त्यांचे पती अभिषेक झा पल्स संजीवनी हेल्थकेअर प्रायव्हेट हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत पूजा सिंघल यांचं पहिलं लग्न प्रशासकीय सेवेतच असलेल्या राहुल पुरवार यांच्याशी झालं होतं. पण लवकरच त्या दोघांत वाद सुरू झाले आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सिंघल यांनी अभिषेक झा यांच्याशी लग्न केलं.




bottom of page