top of page
Writer's pictureMahannewsonline

पूजा कावळे हत्याकांड: पतीनेच रचला पत्नीच्या खुनाचा कट

यवतमाळ : सावंगा (ता, दिग्रस ) शेतशिवारात ४ दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर या परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता कौटूंबिक वाद आणि स्थावर मालमत्तेसाठी पतीनेच पत्नीच्या खुनाचा कट रचून हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

शेलोडी येथील पूजा अनिल कावळे ही विवाहित तरुणी १० नोव्हेंबरला पुण्यासाठी निघाली मात्र ती पुण्याला पोहोचलीच नाही. त्यामुळे मृत महिलेच्या भावाने या प्रकरणी हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानंतर १६ नोव्हेंबरला दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात एका अनोळखी महिलेचे प्रेत काही नागरिकांना दिसून आले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेची ओळख पटविण्यासाठी हालचाल सुरू केली.

हरवलेल्या महिलेच्या प्रकरणातील फिर्यादी भोजराज पंजाबराव वानखडे यांनाही या बाबतची माहिती दिली. त्यावरून मृत महिला ही पूजा अनिल कावळे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तिचा खून झाल्याचे प्रथमदर्शी लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या तपासासाठी स्थानिक गुन्हे सायबर सेलसह चार पथकांची मदत घेण्यात आली. या प्रकरणी उज्वल पंढरी नगराळे, गौरव रामभाऊ राऊत, अभिषेक बबन म्हात्रे या तिघांना एकाच वेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मृत महिलेचा पती अनिल रमेश कावळे हाच असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलाम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल यांनी केली आहे.


bottom of page