top of page
Writer's pictureMahannewsonline

नाद खुळा ! गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट; नववधूसह व्हिडिओग्राफरवर गुन्हा दाखल

हल्लीची तरुण पिढी सोशल मीडियावर सदैव अपडेट राहते. वेगळं काही शेअर करत असतात. असाच काहीसा प्रकार एका नववधूने केला. वेगळ काही करण्याच्या प्रयत्नात चक्क गाडीच्या बोनेटवर बसून आपल्या विवाह सोहळ्याला जाण्याची हौस एका नववधूला महागात पडली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भोसरी परिसरातील सहकार कॉलनी चक्रपाणी वसाहत येथे राहणाऱ्या शुभांगी जरांडे या तरुणीने आपल्या विवाह सोहळ्यासाठी जात असताना दिवे घाटात चक्क गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास केला होता. या प्रसंगाची व्हिडिओग्राफर मार्फत शूटिंग ही करण्यात आली होती. गाडीमध्ये मुलीचे नातेवाईक देखील उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळावारी सकाळी ११ वाजता स्कॉर्पिओ गाडी चालक हयगयीने गाडी चालवत होता. त्यावेळी त्याने नातेवाईक असलेल्या वधूला गाडीच्या बोनेटवर बसवले होते. तर इतर लोक गाडीत बसले होते. त्यावेळी व्हिडिओग्राफर याचे व्हिडिओ शूटिंग करत असताना इतरांच्या जिवितास धोका निर्माण होईल असे वर्तन करत होते. तसेच चेहऱ्यावर मास्कही नसल्याने त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकाळभोर पोलिसांनी नवरी मुलगी शुभांगी जरांडे, स्कॉर्पिओ ड्रायव्हर गणेश लवांडे आणि व्हिडीओ ग्राफर तुकाराम शेंडगे या तिघांवर लोणी काळभोर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम २६९,१८८,२७९,१०७,३३६,३४, आपत्ती व्यवस्थापन कायदा २०५ कलम ५१ब आणि महाराष्ट्र कोविड उपाययोजना कलम २०२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



bottom of page