top of page
Writer's pictureMahannewsonline

... म्हणून आयटी इंजिनिअरने पसरवली विमानात 'बॉम्ब' असल्याची अफवा

पुणे : विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरविल्याप्रकरणी एका आयटी अभियंत्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश सावंत (वय.२८, रा.बाणेर) असे अफवा परविणाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. विमानाची तपासणी केली मात्र त्यामध्ये बॉम्ब आढळला नाही, या अफवेमुळे रांचीला निघालेले विमान तब्बल तीन तास उशीरा उडाले.

ऋषिकेश सावंत हा आयटी कंपनीत नोकरीला आहे. सावंत याच्या पत्नीला रांची येथे जायचे असल्याने शुक्रवारी साकाळी साडे आठ वाजता तो पत्नीला सोडविण्यासाठी विमानतळावर आला होता. १६ ऑक्‍टोबरला त्याच्या पत्नीचे परतीचे तिकीट होते. मात्र धावपट्टीच्या कामामुळे १६ ते ३० ऑक्‍टोबर दरम्यान विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सावंत हा तेथील कर्मचाऱ्यांना विमानाचे १६ ऑक्‍टोबरचे तिकीट १५ तारखेला अधिकृत करून द्या, असे सांगत होता. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने रांचीला निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरविली. यामुळे विमानतळावर चांगलीच खळबळ उडाली.

विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने विमानतळ पोलिस सतर्क झाले. याबरोबरच बॉम्ब शोधक व नाशक पथके, राज्य राखीव बलाच्या तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या तुकड्याही तातडीने तेथे पोचल्या. सावंतने सांगितलेले विमान बाजूला घेण्यात आले, विमानाची तीन तास कसून तपासणी करण्यात आली. दरम्यान, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.


bottom of page