top of page
Writer's pictureMahannewsonline

VIDEO : ‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’वर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात पती-पत्नी आणि त्यांच्या 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. खोपोली एक्झिट आणि फूड मॉलच्या दरम्यान हा अपघात झाला असून या अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून यातून अपघाताची भीषणता दिसून येत आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि गाडी लेन सोडून जात असताना पाठीमागील भरधाव कंटेनरने कारला चिरडले, त्यातच समोरील ट्रकला देखील धडकला.

या भीषण अपघातात कारमधून प्रवास करत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात कंटेनर देखील उलटल्याने चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे जवळपास दोन तास वाहतुक विस्कळीत झाली होती. या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून कार चक्काचूर झाली आहे. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर कारची बॉडी कटरने कापण्यात आली. यानंतर जॅकीन चौटियार, पत्नी लुईसा चौटियार आणि मुलगा डॅरेल चौटियार यांचे मृतदेह त्यातून काढण्यात आले. हे तिघेही पुण्याहून मुंबईत नायगावकडे जात होते.

कंटेनरच्या ब्रेक फेलमुळे हा अपघात झाल्याचे तपासात समोर आले आहे. ट्रकमध्ये बसलेल्या साइड कॅमेर्‍यात हा अपघात कैद झाला आहे.


bottom of page