महिला, तरुणींची छेड काढली तर भरचौकात ...
पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना आता चांगलीच अद्दल घडणार आहे. गणेशोत्सवात देखावे पाहायला आणि गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणींची छेड काढून त्रास देणाऱ्या रोडरोमिओंचे फोटो आता भरचौकात फ्लेक्सवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. तसेच, रोडरोमिओंची परेड देखील घेतली जाणार आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना पुढे येत आहेत. या घटनांमुळं महिलांमध्ये एक असुरक्षितता निर्माण झाली आहे. गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीच्या ठिकाणीही छेडछाड होण्याच्या घटना होतात. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांना छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिलांच्या सोबत गैरकृत्य करताना कोणी आढळून आल्यास, त्यांचे फोटो काढून भरचौकात फ्लेक्सवर नावासह लावून त्यांची रस्त्यावर परेड सुद्धा घेणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा चोरटे भाविकांचा लाखोंचा ऐवज लंपास करतात. खास चोर्या करण्यासाठी परराज्यातील चोरटे पुण्यात या काळात दाखल होतात.. त्यामुळे त्यांच्या बंदोबस्ताची खास जिम्मेदारी गुन्हे शाखेच्या पथकांवर देण्यात आली आहे. गुन्हे शाखेने आतापासूनच याबाबत प्रतिबंधात्मक कामाला सुरुवात केली आहे.
शहराच्या मध्यवस्तीत पोलिसांकडून अठरा मदत केंद्रे उभारण्यात येणार असून ती २४ तास सुरू राहतील. स्थानिक पोलिस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग यांचे अधिकारी कर्मचारी या केंद्रावर कार्यरत राहतील. तसेच शहरातील प्रमुख सहा ठिकाणी पोलिसांच्या शीघकृतीदलाची पथके तैनात करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावर ही पथके पहारा देणार आहेत. त्यासाठी मचान बांधण्याची व्यवस्था देखील पोलिसांनी केली आहे.दहा दिवस त्यांच्याकडून उंचावरून सर्व हालचालीवर त्यांच्याकडून लक्ष ठेवले जाणार आहे.