top of page

भीषण अपघात : टॉवर वॅगेन ट्रेनच्या धडकेत ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ आज ( सोमवारी) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. रेल्वे लाईन दुरुस्त करणाऱ्या टॉवर वॅगेन ट्रेनने धडक दिल्याने ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लासलगाव - उगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लासलगाव - उगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे कर्मचारी ट्रॅक देखभाल, दुरुस्तीचे काम करत होते. त्याचवेळी अचानक रेल्वे लाईनची मेंटनेस करणाऱ्या टॅावरने धडक दिल्याने ४ कामगारांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात संतोष केदारे, दिनेश दराडे , कृष्णा अहिरे , संतोष शिरसाठ या रेल्वे कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेविरोधात व चालकाविरोधात संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी रेल्वे गाड्या रोखून धरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.



bottom of page