top of page
Writer's pictureMahannewsonline

जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचं निधन

जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांनी ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून राम लक्ष्मण यांची प्रकृती खालावली होती. नागपूरमध्ये शनिवारी पहाटे त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सूना, नातवंडे, दोन मुली असा परिवार आहे.

राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. आपले जोडीदार राम यांच्या मृत्यू नंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक सरस, सुपरहिट गाणी दिली.


"संगीतकार राम-लक्ष्मण या जोडीने, दादा कोंडके यांच्या अस्सल मराठी मातीतील चित्रपटांपासून ते हिंदीतील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मैने प्यार किया, हम आपके है कौन अशा अनेक चित्रपटांना दिलेले संगीत तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होते.


‘देवा हो देवा गणपती देवा’, ‘गब्बर सिंग कह के गया’, ‘सुन बेलिया’, ‘तुम क्या मिले जाने जाना’, ‘दीदी तेरा देवर दिवाना’, ‘ये तो सच है की भगवान है’, ‘ढगाला लागली कळ’, ‘मुझसे जुदा होकर तुम्हें दूर जाना है’, ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’यासारखी ही त्यांची गाणी आजही रसिकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या गाण्यांच्या संगीताची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. 2018मध्ये त्यांना राज्य शासनाच्या ‘लता मंगेशकर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.


bottom of page