top of page
Writer's pictureMahannewsonline

रतन टाटा यांचे निधन

उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान रात्री उशीरा त्यांचे निधन झालं. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रसेकरन यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीला देऊन ही माहिती दिली आहे.

तीन दिवसांपूर्वीही रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त होते. मात्र, रतन टाटा यांनी स्वत: सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत यासंदर्भात खुलासा केला होता. ही बातमी अफवा असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटलं होतं. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशीरा त्यांचे निधन झालं.


रतन टाटा यांचा जन्म १९३७ मध्ये मुंबईत झाला. रतन टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू आहेत. रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्कमधून १९५५ मध्ये डिप्लोमा केला.१९९० ते २०१२ पर्यंत २२ वर्षे ते टाटा समुहाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान, त्यांनी टाटा समुहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे. एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच ते त्यांच्या परोपकार अन् दानधर्मासाठीही ओळखले जातात.



bottom of page